‘महाराष्ट्र मिशन १ मिलियन’च्या फुटबॉल वाटपात गोंधळ
फुटबॉल वाटपात काही ठिकाणी गोंधळ झाल्याचे दिसून आले.
मुंबई : ‘महाराष्ट्र मिशन १ मिलियन’ उपक्रमासाठी एक लाख फुटबॉल वाटपाचा अभिनव उपक्रम राज्य शासनाने केला. पण या फुटबॉल वाटपात काही ठिकाणी गोंधळ झाल्याचे दिसून आले. फुटबॉल घेऊन येणारा कंटनेर वाटेतच बंद पडल्याने फुटबॉलचे वाटप करताना क्रीडा खात्याची मोठी दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले.
शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने राज्यातील ३० हजार शाळांमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे एक लाख फुटबॉल वाटण्याचे निश्चित केले होते. त्यासाठी सर्व शाळांना ऑनलाईन नोंदणी करण्यास सांगितले होते.
काय झाला गोंधळ ?
फुटबॉलची डिलिव्हरी घेऊन येणारा कंटेनर महाराष्ट्रात येत असताना वाटेतच बंद पडला. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी आदल्या दिवशी फुटबॉल पोहोचलेच नाहीत.
मुंबई आणि पुण्यात फुटबॉलचे वाटप करून अन्य जिल्ह्यांना मोजकेच फुटबॉल पाठवले गेले.
...आणि धांदल उडाली
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि कोल्हापूरमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ होणार होता.
कार्यक्रमाच्या दिवशी फुटबॉलच मिळाले नसल्याने जिल्हा क्रीडा कार्यालय गोंधळात पडले होते.
काही शाळांना तीन तर काहींना दोन वा एक असे वाटप करण्यात झाले.
काही ठिकाणी आज उशीरा फुटबॉल पोहोचले. तर, ग्रामीण भागातील काही शाळांना फुटबॉल मिळालेच नाहीत. त्यामुळे अनेक शाळांना स्वखर्चाने फुटबॉल घेऊन खेळाचा आनंद लुटावा लागला.