डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जोरदार राडा
कुलगुरूंच्या दालनातच धक्काबुक्की
औरंगाबाद : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सोमवारी जोरदार राडा झाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंच्या दालनातच ठिय्या मांडला. विद्यापीठाच्या वसतिगृहात अनेक लोकं विना अनुमती राहत आहेत त्यांना बाहेर काढा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली. या मागणीसाठी त्यांनी कुलगुरूच्या दालनातच तब्बल दोन ते तीन तास ठिय्या मांडला.
मात्र या आंदोलनाला इतर काही संघटनांनी आक्षेप घेतला आणि त्यामुळे या संघटनांमध्ये कुलगुरूच्या दालनातच धक्काबुक्की झाली या विरोधात आता काही संघटनांनी आज विद्यापीठ बंद पुकारला आहे आणि त्यामुळे विद्यापीठ परिसरात तणाव आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहातील समस्यांचा मुद्दा यामुळे ऐरणीवर आला आहे. वसतिगृहात जुन्या विद्यार्थ्यांनी ठाण मांडल्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. नियमित पाणी पुरवठा होत नाही. अशा अनेक समस्यांमुळे अभाविपने आंदोलन केलं.
अभाविपचं आंदोलनाची माहिती समजल्यानंतर रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते तेथे आले. त्यानंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याने दालनातील आंदोलनाला विरोध केला. यानंतर या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली आणि प्रचंड गोंधळ उडाला. या घटनेच्या माहितीनंतर बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक राजश्री आडे यांनी कुलगुरूंची भेट घेतली.