अजित पवारांचे नाव असलेल्या घोटाळ्याची फाईल पोलिसांकडून क्लोज; रोहित पवारांची चौकशी मात्र सुरु
शिखर बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला. याच प्रकरणात रोहित पवार यांच्यासह अजित पवार यांचे देखील नाव होते. मात्र, रोहित पवार यांची ED चौकशी सुरु आहे.
Maharashtra Politics: शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणात नावे असलेल्या आरोपींना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला. याच गुन्ह्याच्या आधारावर रोहित पवारांची देखील याच प्रकरणात ईडी चौकशी सुरू आहे.
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर यात पहिला क्लोजर रिपोर्ट दाखल झाला होता. मात्र, शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर पुन्हा तपास करायचा असं पोलिसांनी कोर्टात सांगितल होते. अजित पवार शिंदे फडणवीस सरकारसोबत आहेत. मात्र, पोलिसांनी यात पुन्हा दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.
अजित पवार यांच्यासहित अन्य नेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीआयडी आणि आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट असतानाही केवळ राजकीय सूडबुद्धीने रोहित पवार यांच्यावर ED ची कारवाई सुरु असल्याचा आरोप केला जात आहे. रोहित पवार यांच्या ED कारवाई विरोधात राष्ट्रवादीतर्फे राज्यभर सर्व जिल्ह्यात "घंटानाद आंदोलन करणार" आहे.
काय आहे शिखर बँक घोटाळा?
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या शिखर बँकेच्या घोटाळ्यात मोठी अपडेट आहे. कर्जाचं वितरण करताना हजारो कोटी रूपयांचा कथित घोटाळा केल्याप्रकरणी अजित पवारांसह 75 जणांवर टांगती तलवार आहे. यात अनेक बड्या नेत्यांची नावं आहेत. दोन वर्षांपूर्वी या नेत्यांना क्लीन चीट मिळाली होती.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात रोहित पवार यांचा अब्रुनुकसानीचा दावा
मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात रोहित पवारांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलाय. गुलाबरावांनी खोटे आरोप करत आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असा रोहित पवारांचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांनी कोर्टात 100 कोटींचा दावा दाखल केलाय. पुणे न्यायालयात त्यांनी हा दावा दाखल केलाय. त्यामुळे गुलाबराव पाटील विरूद्ध रोहित पवार असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
रोहित पवारांची तब्बल 12 तास ईडी चौकशी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची तब्बल 12 तास ईडी चौकशी झाली होती. बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी ही चौकशी झाली. येत्या 1 फेब्रुवारीला ईडीनं त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले. रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे बडे नेतेही यावेळी उपस्थित होते. शरद पवार पळणा-यांच्या नाही, तर लढणा-यांच्या पाठिशी उभे राहतात, अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांचं कौतुक केलं. तर अजित पवारांना टोला लगावला.