खासदार संजय काकडे यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा
सत्ताधारी भाजपला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. भाजपचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे पोलिसांत शनिवारी रात्री ९.३०च्या सुमारास काकडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे : सत्ताधारी भाजपला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. भाजपचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे पोलिसांत शनिवारी रात्री ९.३०च्या सुमारास काकडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पुण्यातील खडकवासला येथील न्यू कोपरे गावात बनावट कागदपत्रांद्वारे जमीन हडप केल्याप्रकरणी काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील ग्रामस्थांनी दावा केला आहे की, काकडे यांनी जागेच्या मोबदल्यात रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी देण्यात आलेली शासकीय जागा बळकावली आहे. प्राप्त माहितीनुसार, संजय काकडेंसह सूर्यकांत काकडे, अशोक यादव आणि एकावर कलम ४२०, ४०६, ४६५, ४५७, ४६८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुण्यातील न्यू कोपरे गावाच्या पुनर्वसनासाठी सरकारकडून सतरा एकर जमीन देण्यात आली होती. ही जमीन अवैधरित्या बळकावल्याच्या आरोप काकडेंसह चौघांवर आहे. न्यू कोपरे गावचे ग्रामस्थ दिलीप मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू कोपरे गावातील ग्रामस्थांनी सुमारे १४ एकर जमीन सुर्यकांत काकडे यांना विकसन करण्यासाठी दिली होती. मात्र, कागदपत्रातच फेरफार करत ही जमीन १४ ऐवजी ३८ अशी करण्यात आली. त्यापैकी ७ एकर जमीन महापालीकेला देण्यात आली. तर, उर्वरीत जमीनीचे काय हा प्रश्न गावकऱ्यांसमोर होता. त्यामुळे त्यांनी अनेकदा दाद मागितली. मात्र, परिस्थीतीत कोणताच बदल झाला नाही. अखेर ग्रामस्थांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ई. टी. गोटे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनवाई झाली. न्यायालयाने काकडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.