मुंबई : मुंबई विद्यापीठाने पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर वाणिज्य पदवीचा अंतिम वर्षाचा निकाल जाहीर केला. २७ ऑगस्टच्या रात्री हा निकाल जाहीर करण्यात आला. परंतु, सकाळी संकेतस्थळावर विद्यार्थी आपला वैयक्तिक निकाल पाहू शकले नाही. कारण इंटरनेट कनेक्टिव्हीटीच्या समस्येमुळे निकाल संकेतस्थळावर अपलोड झाला नाही, असे विद्यापीठाने सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी. वाय. बीकॉमचा निकाल ६५.५६ टक्के लागला असून एकूण ६५,९९२ विद्यार्थ्यांनी टी. वाय. बीकॉम सेमिस्टर ६ ची परीक्षा दिली होती. त्यापैकी ४३,२६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पण वैयक्तिक निकाल मात्र तांत्रिक अडचणीमुळे अजूनही समजू शकलेला नाही.


सर्व निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत जाहीर करणार असल्याने विद्यापीठाची लगबग सुरू आहे. सर्व शाखांच्या सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनस्क्रीन करण्याच्या कुलगुरूंच्या वादग्रस्त निर्णयामुळे यंदा निकालांचा मोठा घोळ झाला आहे.  परीक्षेनंतर सुमारे पाच महिन्यांनी निकाल जाहीर केल्याने अखेर विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. पण वैयक्तिक निकाल जाणून घेण्यासाठी त्यांना अजूनही वाट पाहावी लागणार आहे.