पुण्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा ताफा अडवला, आप कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ताफ्यासमोर अचानक कार्यकर्ते आल्याने एकच गोंधळ
सागर आव्हाड, झी मीडिया,पुणे : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) पुण्याच्या (Pune) दौऱ्यावर आहेत. पुण्यात त्यानिमित्त भाजपकडून (BJP) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, आज दुपारच्या सुमारास निर्मला सीतारामन यांचा ताफा वारजे (Warje) माळवाडी परिसरातून जात असताना आम आदमी पार्टीच्या (AAP) कार्यकर्त्यांनी महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी, जनविरोधी आर्थिक धोरणे याचा निषेध करत निर्मला सीतारामन यांच्या गाडीचा ताफा अडवला.
अचानक कार्यकर्ते रस्त्यावर आल्याने काही पोलीसही (Pune Police) चक्रावून गेले होते. वारजे माळवाडी परिसरातील आपचे कार्यकर्ते निलेश वांजले यांच्यासह अनेक कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. यावेळी या कार्यकर्त्यांनी महागाई विरोधात (inflation rate), केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात (Economic policy) आणि ऑपरेशन लोटस (Operation Lotus) विरोधात घोषणा देण्यात आल्या. यानंतर आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
निर्मला सीतारामन यांच्या समोर कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी केली. देशासह राज्यात वाढलेल्या महागाईला जबाबदार कोण, अनेक वस्तूंवर वाढवलेली जीएसटी कमी करण्याची मागणी यावेळी या कार्यकर्त्यांनी केली आहे. गादिस्मोरून पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत अर्थमंत्र्यांच्या ताफ्याला जाण्यास जागा करून दिली. यावेळी आपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
निर्मला सीतारामन या पुणे दौऱ्यात बारामतीचा (Baramati) देखील दौरा करणार आहेत. त्यात महत्वाच्या गोष्टींचा आढावा देखील त्या घेणार आहेत. भाजपकडून निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यात सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून निर्मला सीतारामन या पुणे दौऱ्यावर आल्या आहेत. त्यात त्यांच्यावर बारामती मतदार संघाची जबाबदारी देण्यात आल्याने त्या बारामतीचा दौरा देखील करणार आहेत.