पुण्यात भर रस्त्यात तरुणावर गोळीबार
पुण्यात भर रस्त्यामध्ये झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
पुणे : शहरातील दाटीच्या वस्ती असलेल्या शुक्रवार पेठेतील शिंदे आळी येथे भर दुपारी एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. त्याचवेळी कोयत्याचा हल्ला करण्यात आला. तसेच कोयत्याने वार रून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भर रस्त्यात हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. जखमी तरुणाने हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका करून घेत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मंगेश धुमाळ (32, शिंदे आळी, शुक्रवार पेठ) असे यामध्ये जखमी झालेल्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास धुमाळ हा शिंदे आळी येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम समोर उभा असताना त्याच्यावर दोघांनी कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली, यात त्याच्या डोक्यावर जखम झाली. त्यानंतर त्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी त्याला लागल्याने तो जखमी झाला.
धुमाळ याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेली आहे. या घटनेची माहिती कळताच गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भर रस्त्यामध्ये झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले.