अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पाणी शुद्ध करून त्याचा पुनर्वापर करणं ही आज काळाची गरज बनलीय. याच दृष्टिकोनातून पुण्यामध्ये देशातील पहिला ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आलाय. विशेष म्हणजे त्यासाठी टायगर बायो फिल्टर तंत्रज्ञानाचा म्हणजेच गांडूळ तसेच बेक्टेरिया आधारित प्रक्रिया पद्धतीचा वापर करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोन भांड्यांमधील पाणी बघा.. दोन्हीतील फरक अगदी रंगावरूनही लक्षात येतो.  वास घेतल्यास हा फरक आणखी स्पष्टपणे जाणवेल.  एका भांड्यातील पाणी हे ग्रे वॉटर म्हणजे घरातील स्वयंपाकघरातील सांडपाणी, आंघोळीचे पाणी अशा स्वरूपाचं आहे. तर दुसऱ्या भांड्यातील पाणी प्रक्रियायुक्त म्हणजेच शुद्ध स्वरूपातील पाणी आहे.


पुण्यातील सहकारनगर भागात उभारण्यात आलेल्या प्रक्रिया प्रकल्पाची ही  किमया आहे. स्थानिक नगरसेवक तसेच माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्यात आलाय. या प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पात दररोज ५ लाख लिटर अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया होणार आहे. प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर शहरातील बागा, बांधकामं तसेच वाहनं स्वच्छ करण्यासाठी होणार आहे.  


पुण्यामध्ये सध्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांच्या माध्यमातून अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र त्याला अनेक स्वरूपाच्या मर्यादा आहेत, तसेच त्यासाठी येणारा खर्च मोठा आहे. ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प संपूर्णपणे जैविक पद्धतीवर आधारित आहे. विशिष्ट प्रकारचे गांडूळ त्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. प्रायमूव्ह इन्फ्रास्ट्रक्चरनं देशात पहिल्यांदा हे तंत्रज्ञान वापरात आणलय.    


पुणे महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या या प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पाला केवळ दीड कोटी रुपये खर्च आलाय. या प्रकल्पामध्ये  केवळ १ पैशांत ३ लिटर पाण्यावर प्रक्रिया होणार आहे. तूर्तास केवळ १२ घरांमधील अशुद्ध पाणी एकत्र करून त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. संपूर्ण शहरात हा प्रकल्प राबवल्यास पाणीसंकातून निश्चितपणे काहीसा दिलासा मिळू शकतो.