कोल्हापूर : कडकनाथ घोटाळ्याचा पहिला बळी कोल्हापुरात गेला आहे. पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या प्रमोद जमदाडे या तरुणाने आत्महत्या केली आहे. संबंधित तरुणाने कडकनाथ कोंबडी पालनासाठी अडीच लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. कडकनाथ घोटाळाप्रकरणी राज्यभरात अनेक ठिकाणी फसवणूक केलेल्या व्यक्तींच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. फसवणूक झालेल्या तरुणाने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कडकनाथ कोंबडी घोटाळाप्रकरणी चौकशी करून कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इस्लामपूर मधील शेतकऱ्यांना दिलं होतं. काँम्रेड दिग्विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन दिलं होतं.


मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानतंर कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं. या घोटाळ्यात अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. महारयत अॅग्रो कंपनीने जवळपास ८ हजार शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. अनेक ठिकाणी या विरोधात तक्रारी आल्या आहेत. पण पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाईचं आश्वासन दिलं असलं तरी प्रत्यक्षात अजून कोणतीही कारवाई झाली नाही. पण एकाचा बळी गेला आहे.


सांगलीत कडकनाथ कुक्कुटपालन ही योजना सुरु करण्यात आली होती. ज्य़ामध्ये सुरुवातीला शेतकऱ्याला पैसा गुंतवावा लागत होता. यामध्ये लागणारं खाद्य हे कंपनी देत असे. कोंबडी आणि अंडी हे कंपनी पैसे देऊन विकत घेणार होती. ज्यामध्ये शेतकऱ्याला वर्षाला अडीच ते तीन लाखापर्यंतचं आमीष दिलं गेलं होतं. सांगलीसह सातारा, कोल्हापूर आणि राज्यात बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांची अशीच फसवणूक झाली. पैसे देण्याची वेळ आली तेव्हा कंपनीचे मालक फरार झाले.