चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट, पाच जण जखमी
मोबाईल बॅटरीचा स्फोट झाल्याने पाच जण जखमी झाल्याची घटना घडली.
ठाणे : मोबाईल बॅटरीचा स्फोट झाल्याने पाच जण जखमी झाल्याची घटना जिल्हातील शहापूर येथे घडली. जखमी झालेले हे एकाच कुटुंबातील आहेत. या घटनेमध्ये पती आणि पत्नी गंभीररित्या जखमी असून त्यांच्यावर ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. किरकोळ जखमी झालेल्या तिघांवर शहापूर येथे उपचार सुरु आहेत. मोबाईलचा स्फोट मोठा झाला. या स्फोटात घराचेही नुकसान झाले आहे. यावरुन स्फोट किती मोठा होता याचा अंदाज येतो.
या घटनेत जखमी झालेल्यांमध्ये राजेश शिंदे आणि त्यांची पत्नी रश्मी शिंदे हे आहेत. दोघेही गंभीर जखमी झालेत. तसेच त्यांची तीन मुले देखील किरकोळ जखमी झालीत. पहाटेच्या वेळेस घरामध्ये मोबाईल चार्जिंगला लावला होता. मात्र, काही क्षणात जोरदार आवाज होऊन मोबाईलचा स्फोट झाला. या स्फोटानंतर घरात आग लागली. स्फोटानंतर लागलेल्या आगीत घराचे देखील नुकसान झाले.