अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरामध्ये (Nagpur) भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातल्याचा प्रकार समोर आला आहे. भटक्या कुत्र्यांनी (Stray Dogs) नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परिसरात गेल्या आठवड्याभरात तब्बल पाच जणांना चावा घेतला आहे. या हल्ल्यामध्ये डॉक्टर जखमी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारीही दोन निवासी डॉक्टरांना तर एका इंटर्नला मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडली. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका निवासी डॉक्टरवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करत नसल्याने मार्ड संघटनेचे डॉक्टर संतापले असून थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. 


भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या अनेक तक्रारी नागपुरात अनेक ठिकाणी आहे. आता नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय परिसरात भटक्या कुत्र्यांची अक्षरशः दहशत माजवली आहे. शेकडो निवासी डॉक्टर रुग्णसेवेच्या कर्तव्यावर असतात. या डॉक्टरांच्या संरक्षणाकरता शेकडो सुरक्षा रक्षकही या परिसरात आहे. मात्र निवासी डॉक्टर सध्या भटक्या कुत्र्यांमुळे परिसरात वावरताना प्रचंड भीती खाली आहेत.


रविवारी एक महिला निवासी डॉक्टर परिसरात कामानिमित्त फिरत असताना भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. डॉक्टरला खाली पाडत चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी तिच्या शरीराचे लचके तोडले. गंभीर जखमी झालेल्या या महिला निवासी डॉक्टरला लगेच सहकारी डॉक्टरांनी उपचाराकरता नेले.
कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेली ही निवासी डॉक्टर प्रचंड घाबरलेली आहे. या घटनेनंतर थोड्या वेळानंतरच आणखी दोन निवासी डॉक्टरांवरही या मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे महाविद्यालयाच्या परिसरातील निवासी डॉक्टर आणि इंटर्न्स प्रचंड भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा मेडिकल प्रशासनाला दिला आहे. 


भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 2 चिमुकल्यांचा मृत्यू 


गेल्या सात महिन्यात नागपूर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन चिमुकल्यांना जीव गमवावा लागलाय . जून महिन्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात काटोल येथे एका पाच वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागला. तर बुटीबोरी जवळील किरिमिट भारकस येथे एका चार वर्षीय चिमुकलीचा कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला.