पुणे : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ठाणे पोलीस दलातील पाच जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा छोटा भाऊ आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला इकबाल कासकरला मदत केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आलीय. पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवार, पुंडलिक काकडे, विजय हालोर, कुमार हनुमंत पुजारी आणि सूरज मनवर अशी त्यांची नावं आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कासकरला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नेणाऱ्या पोलिसांच्या पथकात या पाच जणांचा समावेश होता. या पाच जणांच्या निगराणीत असताना कासकर जेवण करताना, सिगारेट ओढताना आणि कासकरच्या वकीलांकडून पैसे वाटप करतानाचा व्हीडिओ समाज माध्यमांमध्ये प्रसारीत झाला होता. 


या पोलिसांवर इकबाल कासकरला बिर्याणी खाऊ घालण्याचा आरोप आहे. कासकरला त्याच्या दोन साथीदारांसोबत ठाणे क्राईम ब्रान्चनं २०१७ मध्ये एका बिल्डरकडून खंडणी वसूल करण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. 


काही दिवसांपूर्वी इकबाल कासकर एका कारमध्ये बसून बिर्याणी खात असलेला व्हिडिओ समोर आला होता. पोलिसांनी गाडीतच कासकरला बिर्याणी खाऊ घातली इतकंच नाही तर त्याला सिगारेट आणि फोनवर बोलण्याची संधीही दिली, असा आरोप आहे. यासाठी सर्व पोलिसांनी कासकरकडून काही रुपये घेतल्याचा आरोप आहे. 


आपापासात संगनमत करून वैयक्तिक फायद्यासाठी कासकरला फायदा करून देत पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत ही निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. यामध्ये एका सब इन्स्पेक्टरचाही समावेश आहे. 


ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या आदेशावर जॉईंट कमिशनर मधुकर पांडे यांनी या प्रकरणाची चौकशी केली... त्यानंतर त्यांनी कार्यालयीन चौकशी आणि दोषींना निलंबित करण्याची मागणी केली होती.