मुंबई : चार दिवसांनंतरही कोल्हापूर, सांगली येथील पुराची स्थिती कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पूरग्रस्त कोल्हापूर, सांगलीची पाहाणी करणार आहेत. दरम्यान, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पुराचा कहर असल्याने पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग जलमय झाला आहे. त्यामुळे हा मार्ग बंदच आहे. तसेच कृष्णा नदीची पाणी पातळी ५५ फुटांवर पोहोचल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे पुढच्या तीन दिवसांत पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगलीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईसह कोकण, गोवा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर, सांगली येथील पूरस्थितीमुळे याचा परिणाम दूध पुरवठण्यावर झाला आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई या शहरांना दुधाच्या दुष्काळाचे सावट आहे. पूरस्थितीमुळे कोल्हापूर, सांगलीत दूध संकलनाला खीळ बसली आहे. तर रत्नागिरीत पेट्रोल पंपांवर इंधनाची वानवा दिसून येत आहे. पुराचा फटका हळूहळू राज्याला जाणवू लागला आहे. दरम्यान, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. हजारो लोकांना पुरातून बाहेर काढण्यात यश आले आहे. 


पंचगंगा नदीला आलेल्या महापुरानं कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांबरोबर शहराला पूर्णपणे आपल्या कवेत घेतलंय. जिथे नजर टाकाल तिथे पुराचं पाणी दिसत आहे. अनेक भागाला पूर्णपणे तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. कोल्हापूर शहरातील प्रवेशद्वाराची स्थिती अशीच झाली आहे. तर कोल्हापुरावर ओढवलेल्या संकटाला कोणाला दोषी देण्यापेक्षा या संकटाशी सर्वांनी मिळून लढा दिला पाहिजे असं मत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले आहे.


सांगलीत महापुराची परिस्थिती कायम असून, आयुर्विन पुलाजवळ कृष्णानदीची पाणीपातळी सकाळी ५६ फूट ८ इंच इतकी आहे. सांगलीतील अनेक उपनगरामध्ये अद्यापी पाणी शिरलेले आहे. कालपासून सुरू असलेले बचावकार्य आज देखील सुरू राहणार आहे. एनडीआरएफच्या आणखी दोन टीम आणि २ कोस्ट गार्डच्या टीम जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. लोकांच्या बचाव कार्यासाठी गरज भासल्यास जिल्ह्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यात ७० हजार लोक आणि २१  हजार जनावर स्थलांतरित झाले आहेत. तर जिल्ह्यात २१ हजार पाचशे हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.


कृष्णा नदीला पूर आल्यामुळे सांगली जिल्ह्यातील ६० हजारांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलंय. सांगली शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी शिरलंय. कृष्णेची पाणी पातळी ५५ फुटांवर गेल्यामुळे संपूर्ण शहर जलमय झालंय. एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.  अनेकांचे संसार पाण्यात गेल्यामुळे त्यांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हलवण्यात आले आहेत. 


तर दुसरीकडे कृष्णा नदीच्या काठावरील सांगलीजवळच्या सांगलीवाडीत १० हजार पेक्षा जास्त लोकं पुरात अडकले आहेत. अडकलेले सर्व नागरिक शासनाच्या मदतीची प्रतीक्षेत आहेत. शासकीय बोट मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय. मात्र तरूण मराठा बोट क्लबच्या वतीने लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. 
 
साताऱ्यातल्या कराडजवळ राष्ट्रीय महामार्गावर गेल्या तीन दिवसांपासून पाणी असल्यानं अवजड वाहनं रस्त्यावरच थांबलेली आहेत. या परिस्थितीत वाहन चालक आणि प्रवाश्यांच्या जेवणाची व्यवस्था आजूबाजूच्या गावातले ग्रामस्थ करत आहेत.