प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापुरातील पूरग्रस्त महिलांचा उद्रेक शुक्रवारी पाहायला मिळाला. या महिलांनी पुणे-बंगळुरू महामार्गावरच चक्क चूल मांडली. यावेळी त्यांनी त्यांची व्यथा मांडली. पुणे-बंगळुरू महामार्गावर ऐन मध्यभागी महिलांनी चूल मांडली. उद्रेकाच्या दगडांवर मांडलेल्या या चुलीत शिजत होता तो या महिलांचा असंतोष. कोल्हापुरातील पूरग्रस्तांना अद्याप सरकारी मदत मिळालेली नाही. त्याच नाराजीचा स्फोट झाला आणि छत्रपती शासन संघटनेच्या या महिलांनी महामार्गावरच संसार थाटला. त्यामुळं महामार्गावरची वाहतूक खोळंबली. महामार्ग रोखून धरत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर या महिलांनी आंदोलन करू नये यासाठी पोलिसांनी सांगली फाट्यावर बंदोबस्त ठेवला होता. पण या महिला गनिमी काव्यानं शिरोली पुलावर पोहचल्या. पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि महिला आंदोलकांमध्ये चांगलीच झटापट झाली.


अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलक महिलांना ताब्यात घेतलं. आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर संसार थाटून या रणरागिणींनी कोल्हापुरी बाणा दाखवून दिला. त्यांचा आक्रोश सरकारच्या कानावर लवकर पडावा, हीच अपेक्षा.