कोल्हापूर, सांगली पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांकडून हवाई पाहणी
सांगली, सातारा आणि कोल्हापुरात महापुराने मोठे संकट कोसळले ओढवले आहे.
कोल्हापूर : सांगली, सातारा आणि कोल्हापुरात महापुराने मोठे संकट कोसळले ओढवले आहे. पूर परिस्थिती अतिगंभीर झाली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी लष्कराच्या विमानाने कोल्हापूर, सांगली या भागाची पाहणी केली. त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत.
दरम्यान, NDRF, नौदल आणि तटरक्षक, लष्कर यांच्या पथकांकडून मदत करण्यात येत आहे. मात्र, अजूनही हजारो लोक पुरात अडकलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. सांगली जिल्ह्यात मिरज, वाळवा, शिराळा, पलूस या चार तालुक्यांना आणि सांगली शहर तसेच सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, वाई या तालुक्यांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला आहे. सांगली येथे बोट बुडून ११ जण बुडाले. यातील ९ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.
शहराला दिलेला पुराचा वेढा अजूनही कायम असल्याने शहरातील जनजीवन बुधवारीही पूर्णपणे ठप्प होते. दिवसभरात एनडीआरएफ तसेच स्थानिक यंत्रणेच्या सहकार्याने शहरातील दहा हजार ३४८ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. लष्करी मदत आल्यानंतर स्थलांतराच्या कामाला वेग आला असला, तरी अजूनही शहरातील शेकडो लोक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. लाईट आणि पाण्याविना आता लोकांचे हाल सुरू झाले आहेत.