कोल्हापुराला महापुराचा धोका, एनडीआरएफकडून नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येत आहे.
कोल्हापूर : गेल्या ४ दिवसांपासून कोल्हापुरात सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूर आला आहे. नद्या ओसंडून वाहत आहेत. पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येत आहे. पंचगंगासह, मुख्य नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. कोल्हापुरात महापुराचा धोका वाढला आहे. एनडीआरएफचे जवान नागरिकांना सुरक्षित स्थळी नेत आहेत.
मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. एनडीआरएफच्या आणखी तुकड्या कोल्हापुरात पाठवण्यात येणार आहेत. वृद्ध व्यक्ती, महिला आणि लहान मुलांना आधी सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं काम एनडीआरएफचे जवान करत आहेत.
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम आहे. 100 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेलेत. कोल्हापुरातून जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे.
'2019 पेक्षा जास्त पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. लोकांनी सतर्क राहून सुरक्षित स्थळी जावं. आणखी दोन दिवस पाऊस पडणार असल्यामुळे नद्याची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. आज रात्रीपर्यंत राधानगरी धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होईल. नदीकाठच्या लोकांनी अधिक सतर्क रहावे. अद्याप कोणी पुराच्या पाण्यात थांबला असेल तर तात्काळ सुरक्षित स्थळी जाण्याचे,' आवाहन कोल्हापुरते पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.