खापराच्या तव्यावर भाजलेले खान्देशी मांडे अन् मातीच्या मडक्यात शिजवलेलं इंदापुरी मटण
थंडीची चाहूल लागली की पुणेकरांना वेध लागतात ते महोत्सवांचे... मग ते संगीत महोत्सव असू देत किंवा खाद्य महोत्सव...
अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे : थंडीची चाहूल लागली की पुणेकरांना वेध लागतात ते महोत्सवांचे... मग ते संगीत महोत्सव असू देत किंवा खाद्य महोत्सव...
पुण्यातल्या सिंहगड रस्त्याजवळच्या वडगाव बुद्रुक इथेही सध्या असाच एक खाद्य महोत्सव सुरु आहे. १ ते ३ डिसेंबर दरम्यान आयोजित या महोत्सवामध्ये पुणे, खडकवासला, खेड, इंदापूरमधल्या जवळपास ३९ महिला बचतगटांनी सहभाग घेतलाय.
पुणेकरांना यंदा आपल्या शहरातच संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राची चव चाखायला मिळत आहे. निमित्त आहे ते गावरान खाद्य महोत्सवाचं... यामध्ये जळगावचं वांग्याचं भरीत, बेसन भाकरी, तसंच मासवड्यांपासून इंदापुरी गावरान चिकन, कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, मालवणी पद्धतीचे मासे असे एक ना अनेक कितीतरी पदार्थ इथे पुणेकरांच्या जीभेचे चोचले पुरवत आहेत...
तर चुलीवर खापराच्या तव्यावर भाजलेले खान्देशी मांडे आणि मातीच्या मडक्यात शिजवलेलं इंदापुरी मटण या महोत्सवाचं खास आकर्षण ठरलंय.
पुणे आणि लगतच्या भागातल्या बचतगटांना रोजगार मिळावा यासाठी यशस्विनी सामाजिक अभियानातर्फे पहिल्यांदाच अशा खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. त्यासाठी महिला बचतगटांकरता प्रवेश शुल्कही अत्यंत नाममात्र ठेवण्यात आलं.
गावरान खाद्यसंस्कृतीच्या अस्सल चवीनं पुणेकरांचे चोचले पुरवणाऱ्या या महोत्सवानं, आपलं गावरान हे नाव सिद्ध केलंय. त्यामुळे या खाद्य महोत्सवानं पहिल्याच वर्षी पुणेकरांच्या ताटातच नाही तर मनातही जागा मिळवली आहे.