प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : अनेक स्पेशलिस्ट तुम्ही पाहिले असाल. पण लांग स्पेशालिस्ट टेलर आहे असं कोणी सांगितले तर नक्कीच तुम्ही काही क्षणांसाठी हसाल आणि असा लांग स्पेशालिस्ट कुठे असतो का असंही म्हणाल. पण महाराष्ट्रातल्या एका गावात हे लांग स्पेशलिस्ट आहेत. मात्र तुम्ही विचार करताय तसे हे लांग स्पेशालिस्ट नाहीत. तर त्यांच्या तब्बल तीन पिढ्यांकडून फक्त आणि फक्त लंगोट शिवून घेण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक जण आवर्जून कोल्हापुरात येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापुरातील गंगावेश जाधव लांग स्पेशलिस्ट 


लाल मातीतील कुस्ती खेळताना लांग पकडून प्रतिस्पर्धी मल्लाला चित्रपट करण्याचा प्रयत्न करण्याचे प्रयत्न मल्ल करत असतात. पण अनेक वेळा प्रयत्न करुनही प्रतिस्पर्ध्याचे लांग पकडायला येत नसल्यामुळे अनेकांचा घाम निघतो. त्यामुळे कोणत्याही खेळात खेळाडूचा पोशाख महत्त्वाचा असतो. पैलवनाचा पोशाख असणारी लांग शिवण्यासाठी अख्या महाराष्ट्रातील मल्ल कोल्हापुरातील गंगावेश जाधव लांग स्पेशलिस्ट यांच्याकडे येतात. कुणी पुणे, कुणी नाशिक आणि कुणी लातूर वरून लांग शिवण्यासाठी जाधव यांच्याकडे येत असतात.



गामा पैलवानाची कुस्ती पाहून आली कल्पना


लांग स्पेशालिस्ट जाधव यांचे आजोबा रामचंद्र नारायण जाधव हे कुस्ती शौकीन होते. व्यवसायाने टेलर असल्याने पैलवानांच्या पेहरावाकडे त्याचे विशेष लक्ष होते. एक दिवस ते शाहू खासबाग मैदानात पाकिस्तान मधील विख्यात मल्ल गामा पैलवान यांची कुस्ती पहात असताना त्यांच्या लांगेकडे लक्ष गेलं. त्यांनी घातलेली लांग ही मांड्यांमध्ये व्यवस्थित बसत असल्याने ते कुस्ती व्यवस्थित करू शकत होते. त्यामुळे अशीच लांग आपल्या महाराष्ट्रातील मल्लाना देखील शिवली तर असा विचार रामचंद्र जाधव यांच्या मनात आला. त्यानंतर रामचंद्र जाधव यांनी कुस्तीवर असणाऱ्या प्रेमापोटी पैलवानांना लागणारी लांग शिवायला सुरुवात केली. आज दुसऱ्या पिढीतील सर्जेराव जाधव आणि तिसऱ्या पिढीतील निखिल जाधव हीच परंपरा आजही जपत आहेत.



कुस्तीवरील प्रेमा पोटी जाधव कुटूंबीय पैलवाना मातीवरील कुस्ती साठी लागणारी लांग शिवून देत आहेत. पाहिले महाराष्ट्र केसरी दिनकर दय्यारी यांच्यापासून तर अलीकडेचे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्यापर्यत अनेक दिगग्ज मल्ल जाधव यांच्याकडूनच लांग शिवून घेतले आहेत.


लंगोटचे दर 1000 रुपयांच्या घरात


जाधव टेलर पैलवानासाठी लांग किंवा लंगोट शिवत असताना उत्तम दर्जाचे स्पन कापड आणि विशेष नाडी वापरतात. त्यांनतर लांगला असणाऱ्या मांडीची काठ शिवताना हातावर शिवणकाम करतात. पूर्वी काही पैशात मिळणारी लांग किंवा लंगोट वस्तू आणि सेवा करामुळे आता महागली आहे. एका वर्षांपूर्वी साधारण लंगोट 150 मिळायचा. मात्र आता तो 180 च्या घरात गेलाय. तर 800 रुपयांना मिळणारा लांग आता 900 ते 1000 रुपयांच्या घरात पोहचला आहे.



पाकिस्तानच्या मल्लांनाही भुरळ


पाकिस्तानचा मल्ल सादिक पंजाबी, गोगा पंजाबी असे अनेक दिग्गज मल्लांबरोबर महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेतील पैलवान पृथ्वीराज पाटील , पैलवान माऊली जमदाडे, पैलवान प्रकाश बनकर, हिंदकेसरी गणपत आंदळकर, हिंदकेसरी श्रीपती हनचले, हिंदकेसरी हरीचंद्र बिराजदार मारुती माने, पैलवान युवराज पाटील याच्या सारख्या दिग्गज मल्लांनी जाधव यांच्याकडून लांग शिवून घेतली आहे. यावरुनच जाधव टेलर यांचा लांग शिवण्यातील हातखंडा दिसून येतो. एका अर्थानं जाधव टेलर देखील महाराष्ट्राची कुस्ती परंपरा टिकविण्यासाठी हातभार लावताना दिसून येत आहेत.