Sambhaji Raje On Ajit Pawar: मे महिन्याच्या सुरुवातीला राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा मोठा गट सहभागी झाला. या घडामोडीनंतर मुख्यमंत्रीपदासंदर्भात अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. आता स्वराज्य संघटनेचे संस्थापक आणि माजी भाजपा खासदार छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्रीपदासंदर्भात मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाऊन अजित पवारांना ते दिलं जाईल अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये असतानाच संभाजीराजेंनी अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत असा दावा केला आहे. रविवारी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. अजित पवारांबरोबर भाजपासोबत जाण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे 9 मंत्री पुन्हा शरद पवारांकडे जातील असं भाकितही संभाजीराजेंनी केलं आहे. 


3 पक्ष एकत्र कसे लढणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी आव्हान देऊ सांगू शकतो की मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदेच राहतील. अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाणार नाही. हे केवळ लोकसभा निवडणुकीसाठी जुळवलेलं गणित आहे. तिन्ही पक्ष कसे काय एकत्र विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार?" असा प्रश्न संभाजीराजेंनी उपस्थित केला. अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाईल अशी चर्चा मागील 2 महिन्यांमध्ये अनेकदा समोर आल्या. मात्र यावर वेळोवेळी सध्या सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र त्यानंतरही अनेकदा अजित पवार यांची वर्णी मुख्यमंत्रीपदी लागेल अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु असते. 


अजित पवार ईडीच्या भीतीने गेले


अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा पुन्हा सुरु होण्यामागील कारण ठरत आहे त्यांनी बारामती येथे नुकत्याच घेतलेल्या सभेमध्ये, 'मी त्यावेळी मुख्यमंत्री झालो असतो' हे विधान. याच विधानावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांना लक्ष्य केलं. "या विधानाचा अर्थ त्यांची मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी अजित पवार तिकडे गेले असं म्हणू शकतो. मात्र असं असलं तरी अजित पवार सत्तेसाठी गेले नाहीत तर ईडीच्या भीतीने गेले आहेत. महाराष्ट्रातील जनतेलाही हे ठाऊक असल्याने याचे परिणाम आगामी निवडणुकीमध्ये दिसतील," असं वडेट्टीवार म्हणाले.


ठाकरेंचा हल्लाबोल


अजित पवारांनी बारामतीमध्ये दिलेल्या भाषणावरुन उद्धव ठाकरे गटानेही टीका केली आहे. 'मला सत्तेची हाव नाही. मी सत्तेसाठी हपापलेला कार्यकर्ता नाही' या विधानावरुन उद्धव ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे. अजित पवार हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर कधी बारामतीच्या होमग्राऊंडवर स्वतःचे अशा पद्धतीने स्वागत करून घेतल्याचे दिसले नाही अशी आठवण ठाकरे गटाने 'सामना'च्या अग्रलेखातून करुन दिली आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उदात्त विचाराने पक्षाबाहेर पडलेले नाहीत तर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वगैरेंच्या चौकश्या नकोत या भयाने त्यांनी गुडघे टेकलेत हे बारामतीकरांना ठाऊक असल्याचंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.