अहमदनगर : उच्चशिक्षित आणि अभ्यासू आमदार अशी ओळख असलेले शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचे माजी आमदार राजीव राजळे यांचे निधन झाले आहे. मुंबईतल्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दीड महिन्यांपासून राजळे यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उच्चशिक्षित आणि अभ्यासू आमदार अशी त्यांची ओळख होती. आमदारकीच्या काळातील राजीव राजळे यांची विधानसभेतील भाषण गाजली होती. 2014 मध्ये राजळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगर दक्षिण मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती.


राजळे यांच्या पत्नी मोनिका राजळे या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार आहेत. तरुण वयातच एका अभ्यासू आणि तरुण राजकीय नेत्यावर काळानं घाला घातल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. राजळे हे राज्याचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे होते.


राजळे यांचे व्यक्तीमत्व बहुआयामी होते. टेक्नोसॅव्ही आमदार अशीही त्यांची वेगळी ओळख होती. प्रचंड जनसंपर्क, दांडगा अभ्यास आणि पाथर्डी तालुक्यातील सत्ताकेंद्रांवर निर्विवाद वर्चस्व ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची खास वैशिष्ट्ये होती. राजळेंच्या अकाली मृत्यूने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. राजळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई, वडील आणि भाऊ आहे. राजळे यांच्यावर पाथर्डीत पिंपळगाव कासारला आज म्हणजे रविवारी दुपारी 4.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.