मुंबई : मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून मदत दिली पाहिजे. दिवाळी आणि दसरा हे दोनही सण तोंडावर आहेत. शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. पण दुर्दैव आहे की पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आलेल्या महापुराला अडीच महिने उलटले तरी मदत अद्याप मिळाली नाही. आता तरी सरकारने तातडीने मदत घ्यावी अन्यथा आम्ही बघणार नाही की कोणाची दिवाळी आणि कोणाचा दसरा हे दोनही सण आम्ही गोड होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्याला मदतीची गरज आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही. शेतकऱ्याला केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात रस नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे एकमेकांवर ढकलत आहेत. केंद्राने सुद्धा तातडीने पथके पाठवणे आवश्यक होते. मात्र, तसं झालेलं नाही. हजारो कोटी रुपये केंद्राच्या आपत्ती मध्ये पडून आहेत. जर तातडीची मदत मिळाली नाही तर शेतकरी आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही, राज्य आणि केंद्रातील नेत्यांना आम्ही बघून घेऊ असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.


एफ आर पी चे तुकडे आम्ही कधीही सहन करणार नाही. कारण तो आमचा कायदेशीर अधिकार आहे. नितीमुल्य आयोग असो किंवा कृषिमूल्य आयोग असो त्यांना अधिकार नसताना निव्वळ साखर कारखानदारांचे लांगुलचालन करण्यासाठी अशा प्रकारच्या शिफारसी केलेले आहेत. देशातल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी ऊस उत्पादक शेतकऱ्याला फसवायचा घाट घातलेला आहे.


कारण केंद्रात भाजप आणि राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे महा विकास आघाडीचे सरकार आहे. येरवी हे एकमेकांना बघून घेण्याची भाषा जरी करत असले तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीचे तुकडे करण्याचा ज्यावेळी विषय येतो त्यावेळी हे एकत्र येतात. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संघर्ष आम्ही स्वतः लढण्याचा निर्णय घेतला आहे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.