पुणे : जिल्ह्याच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे आज सकाळी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे निधन झाले. गोरे यांना कोरोनासह इतर आजार असल्याने गेल्या २० दिवसांपासून गोरे यांच्यावरतीउपचार सुरू होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळी नऊ वाजता गोरे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात शोककळा पसरली आहे. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालखंडामध्ये गोरे यांनी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. एक लढवैय्या लोकप्रतिनिधी हरवल्याने पुणे याची जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


अजित पवार यांची श्रद्धांजली


दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पुण्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सहकारी, खेड-आळंदीचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. आज आम्ही आमचा जुना सहकारी, पुणे जिल्ह्याने एक कार्यशील नेतृत्वं गमावले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.


शिवसेनेत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसशी ते प्रदीर्घ काळ निगडीत होते. राष्ट्रवादीशी त्यांचं वेगळे नाते होते. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व प्रदीर्घ काळ सदस्य म्हणून काम केलेल्या सुरेश गोरे यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी आहेत. गोरे कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही प्रार्थना, असे उपमुख्यमंत्री यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.