नवी मुंबईत भाजपला झटका, चार नगरसेवकांचा पालिका आयुक्तांकडे राजीनामा
नवी मुंबईत भाजपला (BJP) पहिला झटका बसला आहे. चार नगरसवेकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मुंबई : नवी मुंबई महापालिकेसाठी ( Navi Mumbai Municipal Corporation) निवडणुकीची जोरदार तयारी भाजपने सुरु केलेली असताना भाजपला (BJP) पहिला झटका बसला आहे. भाजपचे नगरसेवक आणि माजी स्थाया समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांच्यासह आणखी तीन नगरसवेकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (Four BJP corporators resign today ) त्यांनी याआधी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. भाजपच्या या चार नगरसेवकांनी नगरसेवक पदाचा राजीनामा पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे आज सादर केला.
दोन दिवस भाजपने नवी मुंबईत (Navi Mumbai) महाअधिवेशन घेतले होते. यापुढील निवडणुकीत विजयाची सुरुवात ही नवी मुंबईतून करण्याचा निर्धार भाजपच्या नेत्यांनी केला आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी भाजपच्या चार नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. हा भाजपसाठी धक्का मानला जात आहे. तसेच आमदार गणेश नाईक यांच्यासाठी हा जोरदार धक्का असल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या या चार नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला होता.
ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी (प्रभाग क्र.६८), नगरसेविका मुद्रिका गवळी (प्रभाग क्र.७०), संगिता वास्के (प्रभाग क्र. ६९) आणि राधाताई कुलकर्णी (प्रभाग क्र.७३) यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा पालिका आयुक्तांना सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते विजय चौगुले उपस्थित होते. एप्रिलमध्ये पालिका निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेने निवडणुकीआधी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपला पहिला दणका दिला आहे, अशी चर्चा आहे.