COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संगमेश्वर : पोलीस असल्याची बतावणी करून विजापूरच्या ज्ञानयोगी शिवकुमार साखर कारखान्याची तब्बल साडेचार कोटी रूपयांची रक्कम लंपास करणाऱ्या त्रिकुटाला मुद्देमालासह अटक करण्यात आलीय. गजानन महादेव अदडीकर, महेश कृष्णा भांडारकर आणि चालक विकास कुमार मिश्रा अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड शहरातील एका हॉटेलमधून निवृत्त पोलीस उप अधीक्षकासह दोघांचं अपहरण करून ही साडेचार कोटींची रोख रक्कम लुटण्यात आली होती. आपण पोलीस असून, ही संशयास्पद रक्कम असल्याचं सांगत गाडीतील ३ बॅगा या त्रिकुटानं ताब्यात घेतल्या. कऱ्हाड-उंब्रज दरम्यान त्यांनी अपहरण केलेल्या दोघांना गाडीतून बाहेर फेकले आणि साडेचार कोटी रूपय घेऊन, एमएच ४८ एफ २०५६ क्रमांकाच्या हुंडाई गाडीतून पोबारा केला.


ही गाडी मलकापूर आंबा घाटातून कोकणात आल्याचे समजल्यावर देवरूख आणि संगमेश्वर पोलिसांनी सर्वत्र कडक नाकाबंदी केली होती. ती गाडी मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरून संगमेश्‍वरला येत असताना देवरूख आणि संगमेश्‍वर पोलिसांनी तिचा पाठलाग केला. संगमेश्‍वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही गाडी अडवून ताब्यात घेण्यात आली.