लग्नाआधीच होणाऱ्या नवऱ्याला वधूने पाजले विष, कारण वाचून धक्का बसेल
सध्या कोरोनाचे (Coronavirus) संकट आहे. त्यामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. असे असताना लग्नाचे (wedding) मुहूर्त असल्याने लग्न लावण्यावर भर देण्यात येत आहे.
यवतमाळ : सध्या कोरोनाचे (Coronavirus) संकट आहे. त्यामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. असे असताना लग्नाचे (wedding) मुहूर्त असल्याने लग्न लावण्यावर भर देण्यात येत आहे. दरम्यान, विदर्भामधील यवतमाळमधून लग्नासंदर्भात धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे होणाऱ्या नववधुने लग्नाआधीच भावी नवऱ्यावर विषप्रयोग केल्याचे उघड झाले आहे. लग्नाच्या चार दिवस आधी ठरलेले लग्न होऊ नये म्हणून होणाऱ्या नवऱ्याला शितपेयातून विष पाजले. प्रियकराच्या सांगण्यावरून या तरुणीने होणाऱ्या नवऱ्याला शितपेयातून विष पाजले. याबाबत तरुणीने नेर पोलिसांसमोर कबुली दिली आहे. त्यानंतर नववधू आणि आरोपी प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.(Four days before the wedding, the bride poisoned her husband at Yavatmal)
कुटुंबीयांनी लग्न ठरवल्यानंतर नियोजित वराला त्याच्या होणाऱ्या वधूने लग्नाच्या चार दिवसांपूर्वी शितपेयातून विषप्रयोग केल्याने दोन्ही कुटुंबीयांना धक्का बसला आहे. यवतमाळच्या नेर येथे घडलेल्या या धक्कादायक प्रकाराची कबुली विषप्रयोग करणाऱ्या तरुणीने दिली आहे. विशेष म्हणजे ज्याठिकाणी विषप्रयोग करण्यात आला तेथील सीसीटीव्ही चित्रीकरणही पोलिसांच्या हाती लागले आहे. या तरुणीचे आठ वर्षांपासून दुसऱ्याच एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलताना दुसरा विचार केला नसल्याने तिला आता जेलची हवा खावी लागणार आहे.
दरम्यान, कुटुंबीयांनी आपल्या मनाविरुद्ध लग्न ठरवून दिल्याने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढण्याचा प्लॅन तरुणी आणि तिच्या प्रियकराने आखला. प्रियकराने ही आयडिया सूचविली. त्यानंतर होणाऱ्या नवऱ्याला विष मिळविलेले पेय दिले आणि शपथ घातली, अशी कबुली तरुणीने दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. विषप्रयोगानंतर नियोजित वराची प्रकृती चिंताजनक झाली होती. चौदा दिवसानंतर या मुलाची प्रकृती ठिक झाली. तसेच ठरलेले लग्न देखील स्थगित करण्यात आले होते. दरम्यान आपल्यावर विषप्रयोग झाल्याची तक्रार तरुणाने केल्यानंतर पोलिसांनी तपासात रहस्य उलगडले.
जळगावातील नेर तालुक्यातील कोहळा येथील 22 वर्षीय तरुणाचा बाभुळगाव तालुक्यातील तरुणीशी लग्न ठरले होते. लग्नाची तारीख जवळ आली होती. त्यामुळे तरुणी आणि तिचा प्रियकर अस्वस्थ होते. यावर तोडगा म्हणून प्रियकरांने तरुणीला शितपेयातून भावी नवऱ्याला विष पाजण्यास सांगितले, अशी बाब आता पुढे येत आहे. त्यानुसार तरुणीने होणाऱ्या नवऱ्याला लग्नाच्या चार दिवस आधी नेर येथील एका आईस्क्रीम पार्लरमध्ये बोलावून घेतले. तेथे त्याला शीतपेयामध्ये विष पाजले, हे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आयस्क्रीम पार्लर येथील सीसीटीव्ही तपासण्यात आले आणि मुलाच्या तक्रारीवरुन गुन्ह्याचा उलगडा झाला.