योगेश खरे, नाशिक : नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. परराज्यातून आलेले व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकरी निलेश चव्हाण यांची जायखेडा परिसरात द्राक्ष शेती आहे. त्यांच्यासह आणखी तीन-चार शेतकऱ्यांची द्राक्षं सिन्नरच्या व्यापाऱ्यानं २०१८ साली खरेदी केली. ती द्राक्षं विकल्यानंतरही व्यापाऱ्यानं शेतकऱ्यांचे १५ लाख रुपये अजून दिलेले नाहीत. नाईलाजानं चव्हाण यांना पोलिसात धाव घ्यावी लागली. पोलिसांनी हिसका दाखवल्यावर व्यापाऱ्यानं निम्मे पैसे आणून दिले.


नाशिक विभागातील पाच जिल्ह्यात अशाप्रकारे तब्बल 1200 शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. शेतमालापोटीचे 46 कोटी रुपये बुडवून व्यापारी फरार झाले आहेत. नाशिकच्या पोलिस महानिरीक्षकांनी याप्रकरणी विशेष मोहीम राबवली. फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून 12 कोटींची रक्कम वसूल केली.


फसवणुकीचे वाढते प्रकार पाहता शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी व्यवहार करताना खबरदारी घेण्याची गरज आहे. अगदीच गरज भासल्यास या व्यवहारांची माहिती पोलीस ठाण्याला कळवावी. म्हणजे फसवणूक होऊ शकणार नाही.