विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : गुप्तधनाचं आमिष दाखवून तिघा भोंदूबाबांनी औरंगाबादमधल्या एका व्यापाऱ्याला तब्बल 10 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमका काय आहे प्रकार
औरंगाबादच्या एका व्यापाऱ्याच्या घरात सारखी भांडणं व्हायची. मित्रांनी त्याला एका बाबाकडे जाण्याचा सल्ला दिला. तुझ्यावर कुणीतरी करणी केलीय, अशी बतावणी करत या भोंदूबाबानं व्यापाऱ्याकडून पैसे उकळायला सुरुवात केली. कधी घरावर सापाची सावली आहे, अशी भीती दाखवून तर कधी घरात दडवलेलं गुप्तधन शोधून देण्याचं आमीष दाखून 3 मांत्रिकांनी त्याच्याकडून तब्बल 10 लाख रुपये उकळले.


इतकं सारं करुनही गुप्तधन काही मिळालं नाही, म्हणून व्यापाऱ्यानं पैसे परत मागितले तेव्हा मांत्रिकांनी व्यापाऱ्यालाच धमकवायला सुरुवात केली. आम्हाला अघोरी विद्या येते, तुला कोंबडा बनवू, अशी धमकी या मांत्रिकांनी दिली. अखेर या व्यापाऱ्याने छावणी पोलीस ठाण्यात जाऊन फसवणुकीची तक्रार दाखल केली.



पोलिसांनी या भोंदू मांत्रिकांविरुद्ध अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 


अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणाऱ्या या भोंदूबाबांवर कारवाई व्हायलाच हवी. पण असे भामटे मांत्रिक तुमच्या अडीअडचणी सोडवू शकत नाही, ते फक्त तुम्हाला फसवतात, हे प्रबोधन करण्याचीही तितकीच गरज आहे.