आलिशान गाडीसाठी मित्राची हत्या, सिनेमा पाहून आखला प्लॅन
या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे
कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : तरुणाईवर हॉलिवूड, बॉलिवूडचा प्रचंड प्रभाव असतो. हे अनेक घटनांमधून स्पष्ट झालं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये चित्रपटाच्या प्रभावामुळे एका तरुणाने मित्राची हत्या केली. पिंपरी चिंचवडच्या दापोडी परिसरात राहणाऱ्या अब्दुल आहात सय्यद सिद्दकी या १७ वर्षीय तरुणाची त्याचाच मित्र असलेल्या उमर नासिर शेखने हत्या केली. शनिवारी मध्यरात्री झालेल्या हत्येनंतर उमरने अब्दुलच्या वडिलांना फोन करून ४० लाखांची खंडणी मागितली होती. या घटनेनंतर भोसरी पोलिसांनी उमर शेख याला अटक केली. पण पोलिस तपासात आता धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
अब्दुलच्या वडिलांचा छोटा मोठा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे प्रचंड पैसे आहेत असं उमरला वाटले. म्हणून त्याने अब्दूलचे अपहरण करून पैसे उकळण्याचा त्याचा प्लॅन होता. विशेष म्हणजे उमरला ही कल्पना खतरनाक खिलाडी २ या चित्रपट पाहून आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. या चित्रपटात आलिशान गाडी घेण्यासाठी एका भाईंचे अपहरण केले जाते असे दाखवण्यात आले. उमरने मात्र मित्राचेच अपहरण करून हत्या केली.
या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. चित्रपट आणि तरुणाई हे अतूट समीकरण आहे. चित्रपट पाहून एखाद्या हिरोची स्टाईल कॉपी करण्यापर्यंत ठीक आहे. पण जर चित्रपटातून प्रेरणा घेऊन हत्या केली जात असेल तर मात्र गंभीर बाब आहे हे मात्र तितकंच खरे...