कल्याण : उसने घेतलेले पैसे परत देत नसल्याने मित्राचीच कोयत्याने वार करत मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व तिसगाव नाका परिसरात आज दुपारच्या सुमारास घडली. बिपिन दुबे असे मयत इसमाचे नाव आहे . धक्कादायक म्हणजे आरोपी राजेश्वर पांडे याने कोळशेवाडी पोलीस ठाण्याला हत्या केल्याची माहिती दिली. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात राजेश्वर पांडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राजेश्वर पांडे याला कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण पूर्व परिसरात तिसगाव नाका येथील एका इमारतीमध्ये राजेश्वर पांडे राहत आहे. याच परिसरात राहणारा बिपिन दुबे हा राजेश्वर पांडे याचा मित्र होता. बिपिन दुबे याने काही महिन्यांपूर्वी राजेश्वर पांडे यांच्याकडून काही कामानिमित्त साडे चार लाख रुपये उसने घेतले होते. राजेश्वरने अनेकदा बीपीनकडे पैशांची मागणी केली मात्र बिपिन टाळाटाळ करत होता. आज दुपारी राजेश्वर याने बिपिनला घरी  बोलावलं. दोघांनी दुपारच्या सुमारास मटण खाल्लं, दारू प्यायली. त्यानंतर राजेश्वरने बिपीनकडे पैसे मागितले. या दोघांमध्ये या पैशांवरून वाद झाला. या वादातून राजेश्वरने बिपिनवर कोयत्याने वार करत बीपीनची हत्या केली.


धक्कादायक बाब म्हणजे राजेश्वर यानेच कोळशेवाडी पोलीस ठाण्यात फोन करून मी बिपीनची हत्या केल्याचं सांगितलं. घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मयत बीपींनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर आरोपी राजेश्वर पांडे याला कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली पुढील तपास सुरू केला आहे.


पैशांमुळे मित्रानेच मित्राची हत्या केल्याचं ही पहिली घटना नाही. पण अशा घटना वाढत आहेत. पैशांच्या वादातून आतापर्यंत अनेक अशा घटना घडल्या आहेत.कोळशेवाडी पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.