मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अयोध्येला जाणार असल्याची माहिती दिली. त्यापाठोपाठ आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत 5 जूनला अयोध्येला जाण्याची घोषणा केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला त्यानंतर राज्यात शिवसेनेला जनतेचा पाठिंबा मिळू लागला. अयोध्येतील राम मंदिर प्रकरणावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 'ते जर माझे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे' असे म्हटले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या याच विधानामुळे शिवसेनेची लोकप्रियता वाढली.


हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेऊन लढणाऱ्या शिवसेनेसोबत असलेली युती भाजपने तोडली. तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीच ही घोषणा केली होती. त्यांनतर भाजपने हिंदुत्वाच्या मुद्यावर देशात सत्ता काबीज केली. तर, शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करत महाराष्ट्रात सत्ता मिळविली.


मात्र, विरोधी पक्षात बसलेल्या भाजपने सातत्याने शिवसेनेवर हिंदुत्वावरून टीका सुरु केली. तर, राज ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे मनसेसोबत जवळीक साधण्यास सुरवात केलीय. राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंगे काढले नाही तर स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवू, ३ तारखेपर्यत भोंगे न उतरविल्यास...असा इशाराही त्यांनी दिलाय.  


राज ठाकरे यांच्या या भूमिकेला भाजपने पाठिंबा दिला. त्यामुळेच महाराष्ट्रातले हनुमान चालिसाचे हे लोन देशभरात पसरले. आपल्या हातातून हिंदुत्वाचा मुद्दा सुटून तो राज ठाकरे यांच्या हाती चाललाय याची भीती आता शिवसेनेला वाटत आहे. त्यामुळेच काल संजय राऊत यांनी मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती दिली.


आदित्य यांची तारीख अद्याप ठरलेली नाही. ही आमची काही राजकीय यात्रा नाही तर श्रद्धा यात्रा असल्याचे राऊत म्हणालेत. तसेच, वर्षभरापासून अयोध्येला जाण्याचे आम्ही ठरवत आहोत. गेल्या वर्षभरात कोविड काळात अयोध्येला जाऊ शकलो नाही. काही बंधन होती, त्यामुळे आता ही बंधने दूर झाल्यावर अयोध्येला जात असल्याचे ते म्हणालेत.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन महत्वाच्या मोठ्या घोषणा केल्यात. यात त्यांनी 5 जूनला अयोध्येला जाण्याची घोषणा केली. मस्जिदिवरील भोंग्यावरून राज ठाकरे यांचा 'डंका' वाजत आहे. आदित्य आणि राज यांनी अयोध्येला जाऊन आपापल्या पक्षाचा जनाधार वाढविण्याची रणनिती आखली आहे. मात्र, अयोध्येच्या मुद्यावरून महाराष्ट्रात 'आदी' कुणाचे 'राज' येणार हाच प्रश्न आहे.