भाजपकडून फडणवीसांना बहुजनांचा नेता म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न; जाहिरातबाजीनं प्रतिमा उजळणार का?
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच निवडणुकीला सामोरं जाणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे फडणवीसांना टार्गेट करत असताना भाजपकडून फडणवीसांना बहुजनांचा नेता म्हणून प्रोजेक्ट करण्यात येतेय.
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातल्या वृत्तपत्रातल्या या जाहिराती पाहा... राज्यातल्या जवळपास सगळ्याच आघाडीच्या वृत्तपत्रांचं पहिलं पान आणि शेवटचं पान फडणवीसांच्या जाहिरातींनी व्यापलं होतं... गेल्या काही महिन्यांपासून फडणवीस हे मराठाविरोधी असल्याचा प्रचार जरांगे पाटलांकडून केला जातोय. मनोज जरांगे पाटील जवळपास प्रत्येक व्यासपीठावरुन फडणवीसांनी मराठ्यांचं नुकसान केलं अशी टीका करतात. जरांगे पाटलांच्या या प्रचाराला उत्तर देण्यासाठी फडणवीसांच्या कॅम्पातून बहुजनांचा नेता अशी प्रतिमा तयार केली जातेय. त्याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या काळात बहुजनांसाठी घेतलेल्या निर्णयांची भाजप नेत्यांकडून उजळणी केली जातेय. या शिवाय गोरगरिबांचा सामान्यांचा नेता अशी लोकभावना तयार होईल याची काळजी घेताना भाजप आणि फडणवीस दिसतायेत.
लोकसभा निवडणुकीत भाजप संविधानविरोधी पक्ष असल्याचा आरोप करण्यात आला. विधानसभेलाही संविधानविरोधाचं अस्त्र विरोधकांच्या भात्यात आहे. कोल्हापुरातल्या राहुल गांधींच्या सभेतूनही यावेळीही संविधान विरोधाचा मुद्दा हातात घेण्याचे संकेत राहुल गांधींनी दिले. विरोधकांच्या या मुद्याला उत्तर देण्यासाठी घर घर संविधान हा उपक्रम सरकारनं हाती घेतला. विरोधकांच्या आरोपांला उत्तर म्हणून फडणवीसांनी देशात पहिल्यांदा घरघर संविधान ही संकल्पना राबवण्याची जाहीरात करण्यात आलीय.
जनसमुदायाविरोधी नेता असा देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला जाऊ लागलाय. त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी फडणवीसांनी आणि भाजपनं खुबीनं कॅम्पेन सुरु केलंय. शिवाय फडणवीसही कोणत्याही समाजाबाबत बोलताना अतिशय मोजून, तोलून मापून बोलतायत. या जाहिरातबाजीनं फडणवीसांची प्रतिमा उजळणार का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.