सोलापूर: येत्या २३ तारखेला होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये २ हजार क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आलंय. सोमवारपर्यंत त्यात वाढ करण्यात येणार असून, गेल्या पाच दिवसात उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात ७ टक्क्याने वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात उजनी मृत साठ्यातून बाहेर येण्याची शक्यता आहे. या पाण्यामुळे वारकरी भाविकांना पवित्र स्नानाचा आनंद घेता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी सणसरहून बेलवडीकडे मार्गस्थ झाली. ही पालखी बेलवडीमध्ये दाखल झाली असून, तुकोबांच्या पालखीच पहिला गोल रिंगण सोहळाही इथे पार पडला.  दुपारच़्या विसाव्यानंतर पालखीचं निमगाव केतकीकडे प्रस्थान ठेवेल. तुकोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम निमगाव केतकीमध्ये असणार आहे.


ज्ञानोबा माऊलींची पालखीही मार्गस्थ


दरम्यान, महाराजांच्या पालखीच्या गोल रिंगण सोहळ्यात अबालवृद्ध वारकरी पताका, विणा, टाळ आणि मृदंघ घेऊन मोठ्या उत्साहात सहभागी झाले. महिला वारकऱ्यांनी डोक्यावर तुळस घेऊन रिंगणस सोहळ्यात सहभाग घेतला. दरम्यान तरडगावातील मुक्कामंतर संत  ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळाही तरडगावहून फलटणकडे मार्गस्थ झाला. माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम फलटण इथं असेल... 


पालखी तळाचे होणार सुशोभिकरण


दरम्यान, राज्य शासनानने आता तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजने अंतर्गत पालखी तळ सुशोभिकरणाचं काम हाती घेतल आहे. भंडीशेगाव इथे घडीव आकर्षक दगडापासून भव्य असा पालखी तळ  बनव्यात येत आहे. दोन्ही पालखी तळाच्या प्रवेश ठिकाणी आकर्षक अशा स्वागत कमानी बनवण्यात आल्या आहेत. या दोन्ही पालखी तळाच्या स्वच्छतेचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं प्रांताधिकारी सचिन ढोल यांनी सांगितलंय. पालखी तळावर भाविकासाठी अतिरिक्त कायमस्वरूपी शौचालयाची उभारणीही करण्यात आली आहे.