यशवंत जाधव यांच्या `मातोश्री` गिफ्टवरुन फडणवीस म्हणाले...
आयकर खात्याला मिळालेल्या डायरीत यशवंत जाधव यांनी `मातोश्री`ला महागड्या वस्तू भेट दिल्याची नोंद आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केलीय.
नागपूर : मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर खात्याने घातलेल्या धाडीत एक महत्वाची डायरी सापडली. यात ५० लाखांचे घड्याळ, गुढी पाडव्याला सुमारे २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू 'मातोश्री'ला दिल्याची नोंद आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.
यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केलीय. विधानसभेत 'कोविडच्या नावावर भ्रष्टाचार झाला. मुंबईकरांना लुटण्याचा काम करण्यात आलं' असा आरोप केला होता. तो खरा असल्याचं सिद्ध होतंय.
जाधव यांच्या डायरीत कोणती नोंद आहे हे मी बघितले नाही.. Income tax याबाबत चौकशी करेल. पण, मुंबईकरांची 100 टक्के लुबाडणूक झाली. 24 महिन्यात त्यांनी 38 प्रॉपर्टी घेतल्या. कोविडच्या नावावर भ्रष्टाचार झाला. मुंबईकरांना लुटण्याचा काम त्यांनी केलंय, असा आरोप फडणवीस यांनी केलाय.
विधानसभेत फडणवीसांनी केले होते हे आरोप
मुख्यमंत्री भाषण चांगले देतात. पण, देण्याच्या नावाखाली लुटत आहेत. महापालिकेत कोव्हीड सेंटर घोटाळा झाला. कोव्हीड सेंटर उभारणी, साहित्य खरेदी, मनुष्य पुरवठा करण्यात घोटाळा. अर्ज नाही, टेंडर नाही. पण, पदाधिकारी आहे म्हणून त्याला काम देण्यात आले. ३८ कोटीचे काम देण्यात आले. पैसेही दिले, ज्याला अनुभव नाही अशा व्यक्तीला काम दिले.
ज्या कंपनीला पुणे येथे ब्लॅकलिस्ट केले. त्याच कंपनीला मुंबईत पाच कोविड सेंटरचे काम दिले. आशा कॅन्सर रिसर्च सेंटरला काम दिले पण ती संस्था रजिस्टर नाहीच. मुलूंडलाही या संस्थेस काम दिले. कोरोना काळात मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले गेले. हजारो कोटीचे टेंडर कोरोना काळात आॅनलाईन मिटिंगमध्ये देण्यात आले.
मुंबई मेली तर चालेल. पण, यांचे स्वतःचे घर भरण्याचं काम सुरू आहे. मराठी माणसाला लुटणारे ते दैवत आणि त्याविरोधात आवाज उठणारे ते शत्रू. पण, आता नेमके शत्रू कोण हे सगळ्यांना लक्षात आले.
'टेंडर पर टेंडर नो सरेंडर' अशी परिस्थिती असल्यामुळेच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे ३०० कोटी संपत्ती सापडली. कोरोना काळात लोक मरत होती त्यावेळेस जाधव संपत्ती जमा करत होते, असा आरोप त्यांनी केला.
फडणवीस यांनी सादर केलेली घोटाळ्यांची यादी
कोविड सेंटर उभारणीत घोटाळा
साहित्य खरेदीत घोटाळा
उपकरण खरेदीत घोटाळा
संचालन कंत्राटात घोटाळा
मनुष्यबळ पुरवठ्यात घोटाळा
डेडबॉडी कव्हर खरेदीत घोटाळा
फेसमास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड खरेदीत घोटाळा
पदाधिकार्यांच्या कंपन्यांनाच कामे
रेमडेसिवीर खरेदी घोटाळा