आशीष अम्बाडे, झी 24 तास, गडचिरोली :  गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे शासकीय अनास्थेमुळे विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. वारंवार मागणी करून देखील महिला अधिक्षिका-कर्मचारी नसल्याने कुचंबणा असह्य झालेल्या विद्यार्थिनींनी घरी परतणे पसंत केले आहे. या सर्व प्रकारावर प्रशासन मात्र ढिम्म आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील अनुसूचित जाती नवबौध्द शासकीय आश्रमशाळा वस्तीगृहात महिला अधिक्षिका-कर्मचाऱ्यांची नेमणूक न झाल्याने 100  विद्यार्थींनीनी शाळा सोडून घरी जाणे पसंत केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथे आश्रमशाळेची सुसज्ज इमारत आहे, शिक्षक आहेत. साधने आहेत. विद्यार्थीनींची प्रवेश संख्या उत्साहवर्धक आहे. मात्र सुरक्षित वातावरणाची उणीव आहे. सुमारे 6 वर्षे मुलींच्या वसतिगृहात महिला अधिक्षिका नसणे हे सामाजिक न्याय खात्याचे सपशेल अपयश आहे. 'शिकवा मुलींना फायदे समाजाला' हा कंठशोष करणारे गेलेत कुठे ? असा प्रश्न विचारला जात आहे.


2013 साली हे वसतिगृह सुरू झाले होते. मात्र ही पदे कधीही भरली गेली नाहीत. विद्यार्थिनींनी वारंवार यासंदर्भात प्रशासनाला जाणीव करून दिली होती. 17 जुलै रोजी विद्यार्थिनींनी एक पत्र देत 20 तारखेपर्यंत अधिक्षका नेमणूक न झाल्यास शाळा बंद करून मूळ गावी परतू असा इशारा दिला होता. या निर्णयानंतर पालक आज शाळेत दाखल झाले आणि आतापर्यंत शंभर मुली शाळा सोडुन घरी परतल्या आहेत. महिला अधिक्षिका नसल्याने या वस्तीगुहात शिक्षण घेत असलेलया विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याने कंटाळुन मुलींनी हा निर्णय घेतला आहे.