आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली:  गडचिरोली जिल्ह्यातील महागावच्या कुंभारे कुटुंबातील पाच जणांना संपविण्यासाठी प्रतिबंधित थॅलियम धातूचा सून  आणि मामी ने वापर केल्याचा खुलासा झाला आहे. या धातुमिश्रित विषाच्या वापरावर जगातील अनेक देशात बंदी आहे. या आरोपींना हे विष कुठे मिळाले? त्याचा प्रयोग त्यांनी कसा केला? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

26 सप्टेंबरला शंकर कुंभारे, दुसऱ्या दिवशी 27 ला पत्नी विजया यांचा मृत्यू झाला. पुढे 8 ऑक्टोबरला मुलगी कोमल दहागावकर, 14 ऑक्टोबरला आनंदा उराडे, तर लहान मुलगा रोशन याचा 15ऑक्टोबरला मृत्यू झाला. त्याची दखल घेत  पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी चौकशीचे आदेश दिले. 


पोलिसांनी पाचही जणांच्या मृत्यूचे गूढ उकलल्यानंतर घरातील बीएस्सी एग्री उत्तीर्ण सून संघमित्रा कुंभारे व मामी रोजा रामटेके यांना अटक केली. न्यायालयाने दोघींना 10 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. तपासादरम्यान दोघींनी धातूमिश्रीत विष देऊन अतिशय थंड डोक्याने पाचही जणांचा जीव घेतल्याची कबुली दिली.


शंकर कुंभारे यांचा लहान मुलगा रोशन याचा अकोला जिल्ह्यातील पातूर येथील संघमित्रा गवई हिच्याशी डिसेंबर 2022 मध्ये प्रेमविवाह झाला. दोघेही पोस्टात नोकरीला होते. प्रेमविवाह मान्य न झाल्याने एप्रिल 2023 मध्ये संघमित्राच्या वडिलांनी आपली जीवनयात्रा संपवली. 


कृषिशास्त्रात पदवीधर असलेल्या संघमित्राला थॅलियम धातूबाबत माहिती होती. इंटरनेटवर तिने सर्चसुद्धा केले. थॅलियम आणण्याची रोजा रामटेके हिने तेलंगणात जाऊन थॅलियम आणले. हे विष पाण्यात टाकून पाहिले असता ते पाण्यात विरघळणारे, रंगहीन, गंधहीन व चवहीन असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी संधी मिळेल तेव्हा ते विष मृतकांच्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये मिसळले. 


मृत्यू झालेल्या पाच जणांचा व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. यातील पाचही जणांमध्ये जी लक्षणे दिसत होती; ती संघमित्रा कुंभारे व रोजा रामटेके यांच्यात दिसत नव्हती. त्यामुळे त्या ठणठणीत दिसत होत्या. यावरुन पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी दोघींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता भयावह माहिती पुढे आली.


गडचिरोली अहेरी तालुक्यातील महागाव(बु) येथील कुंभारे परिवारातील पाच जणांच्या हत्येसाठी जगातील अनेक देशांनी प्रतिबंधित केलेल्या थॅलियम धातूचा वापर केल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. हा धातू तेलंगणा राज्यातून आणल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असले तरी त्याचा मुख्य स्त्रोत शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.


या घटनेतील तीन अन्य पीडित उपचार घेत असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. पारासदृश थॅलियम धातू हा रंगहीन, गंधहीन व चवहीन असल्याने हळूहळू शरीरात पसरुन मृत्यूस कारणीभूत ठरतो. जगातील काही मोठ्या नेत्यांच्या हत्येत थॅलियमचा वापर केला गेल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अमेरिकेसह काही देशांमध्ये या धातूवर बंदी आहे.