Viral Video: भंगारातल्या गाड्या चालवतेय एसटी महामंडळ! हातात छत्री घेऊन पळवावी लागली बस
Gadchiroli News : हातात छत्री घेऊन एसटी बस चालवणाऱ्या चालकाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. गडचिरोलीतील एका बस आगारातील बसचा हा व्हिडीओ असल्याचे समोर आलं आहे.
आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाच्या (MSRTC) भोंगळ कारभाराची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. गडचिरोलीच्या (Gadchiroli) अहेरी आगारातील छप्पर उडालेल्या आणि एका हातात स्टेरिंग आणि एका हातात वायपर फिरवत असलेला बसचा व्हिडिओ राज्यभर तुफान गाजलेला असताना या आगाराचा आणखी एक नवा व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. गळक्या बसमुळे बसचालकाला चालत्या बसमध्ये छत्री खोलून बस चालवत असल्याचे समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
पाऊस सुरू असताना अहेरी आगारातील एका बसमध्ये छत गळत असल्याने चक्क चालक बस मध्ये छत्री घेऊन बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या नव्या व्हिडिओमुळे अहेरी आगारातील भंगार बसगाड्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. असे अनेक प्रकार अहेरी आगारात याआधीही घडलेले असतानाही राज्य सरकारचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये बसचालक गळक्या छतापासून वाचण्यासाटी एका हातात छत्री तर दुसऱ्या हाताच स्टेअरिंग धरुन बस चालवत आहे. यामुळे बसमधील प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र या आगाराला नवीन बस गड्यात पुरवण्यात दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. एकीकडे गडचिरोलीत विमानतळ उभारण्याच्या चर्चा सुरु असल्या तरी गोरगरिबांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या याच आगारातील बसचा छप्पर उडत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराची बस क्र. एमएच 40 वाय 5494 ही गडचिरोली मुलचीरा मार्गे अहेरी या मार्गावर धावत होती. त्यावेळी वाहकाच्या बाजूकडील बसचे छत पूर्णपणे उखडून हवेत उडत होतं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एसटी महामंडळाने स्पष्टीकरण देत कारवाईची माहिती दिली. या बसचे दुरुस्तीचे काम विभागीय कार्यशाळेमध्ये विहित वेळेत न केल्याने संबंधित विभागाचे यंत्र अभियंता शी.रा. बिराजदार (विभागीय यंत्र अभियंता, गडचिरोली) यांना निलंबित करण्यात आले, असे प्रशासनानं सांगितलं आहे.