अकोट, अकोला : अकोट नगरपालिकेच्या तीन नगरसेवकांसह एका नगरसेविकेच्या मुलाला जुगार अड्ड्यावर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अकोटमध्ये पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धा़डसी कारवाई केली. त्यात २८ जुगाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. यात मुख्तार अय्युब खान, सलीम नबीउल्ला खान, आरिफ मारूफ हे तिघे नगरसेवक जुगार खेळायला आले होते... तर नगसेविकापुत्र मनोज चंदन हा ही इथे जुगार खेळत होते. आणखी एक आरोपी जितेंद्र चंडालिया हा माजी नगराध्यक्षांच्या कुटुंबातला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोट नगरपालिकेतले हे लोकप्रतिनिधीच असे जुगारी झाल्याचं धक्कादायक चित्र पाहायला मिळालं. अकोट शहरातल्या अंजनगाव मार्गावर माऊली मनोरंजन केंद्रावर हा जुगाराचा अड्डा सुरू होता. संध्याकाळी साडे सात वाजल्याच्या सुमाराला पोलिसांनी अचानक छापा मारला. 


कारवाईत शहरातली अनेक बडी धेंडं पोलिसांच्या तावडीत सापडली आहेत. कारवाईत पोलिसांनी ५० हजारांच्या रोख रक्कमेसह सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अनेक जण फरार झालेत. त्यांच्या मुसक्या आवळल्यावर जुगारी आरोपींची संख्या वाढणार आहे. उपअधीक्षक डॉ. निलेश देशमुख यांची ही गेल्या १० दिवसांतली चौथी मोठी कारवाई आहे.