मुंबई : Ganesh Chaturthi 2021: मुंबई, पुणे, नाशिक, कोकणासह राज्यभरात गणरायाचं आगमन झाले आहे. पुढचे दहा दिवस चौदा विद्या आणि चौसष्ट कलांच्या देवतेच्या भक्तीरसाचे असणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करताना मुंबईत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक गणपतींचं मंडपात जाऊन दर्शन घेण्यावर बंदी घातली गेली आहे. तर पुण्यातली जमावबंदी मागे घेण्यात आली आहे. (Ganesh Chaturthi : Ganpati Festival in Maharashtra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील गणेशगल्लीतील मुंबईच्या राजाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी बाप्पाची विधीवत पूजा करण्यात आली. यंदा कोरोनामुळे साधेपणानेच उत्सव साजरा केला जात आहे. कोरोनाचे नियम पाळून मुंबईच्या राजाची पूजा पार पडली. 



दादर मार्केटमध्ये गणपती उत्सवानिमित्ताने खरेदीसाठी झालेली अफाट गर्दी.



मुंबईत सिद्धीविनायक मंदिरात पहाटेच आरती पार पडली. कोरोनामुळे मंदिरं बंद आहेत मात्र 'झी 24 तास'च्या माध्यमातून प्रेक्षकहो आपणही ही आरती घरबसल्या पाहू शकता. तसेच मुंबईच्या गणेशगल्लीच्या गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आरती करण्यात आली. रांजणगावच्या महागणपती मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विविध रंगी विद्युत रोषणाईनं परिसर उजळून गेलाय. यंदा कोरोना मुळे महागणपती चा भाद्रपद यात्रा उत्सव मर्यादित स्वरुपात होणार आहे. 


सिद्धीविनायक दर्शन



गणेश गल्लीचा बाप्पा



अष्टविनायक भाविकांचे श्रद्धास्थान


महाराष्ट्रातील अष्टविनायकांची ठिकाणं म्हणजे भाविकांचं श्रद्धास्थान आहे. पुणे जिल्ह्यात पाच, अहमदनगर जिल्ह्यात एक आणि रायगड जिल्ह्यात दोन स्थान आहेत. अनेक भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. त्याची सुरुवात मोरगावपासून केली जाते. मोरेश्वराचं दर्शन घेऊन पुढे अष्टविनायकांचं दर्शन घेतलं जातं. मोरगावपासून पुढे नगर जिल्ह्यात भिमा नदीच्या किनारी सिद्धटेकचा सिद्धिविनायक आहे. 


पुणे-नगर महामार्गावर रांजणगावचा महागणपती आहे. तेथून जवळच भाविकांना चिंता मुक्त करतो, अशी श्रद्धा असलेला थेऊरचा चिंतामणी आहे. पुढे ओझरचा विघ्नेश्वर आहे. लेण्याद्रीचा गिरीजात्मक विनायक डोंगरामध्ये वसलेला आहे. रायगड जिल्ह्यात खोपोलीजवळ महडचा वरदविनायक आहे. तर महडपासून जवळ असलेल्या पालीमध्ये नवसाला पावणारा बल्लाळेश्वर आहे. या अष्टविनायक स्थानांच्या दर्शनासाठी वर्षाभर भाविकांची गर्दी असते.


कोकणात गणेशोत्सव; जल्लोषाला प्रारंभ


कोकणात गणेशोत्सवाच्या जल्लोषाला प्रारंभ झाला आहे. कोकणात गणेश भक्तांनी अत्यंत पारंपरिक पद्धतीनं आपल्या डोक्यावरून गणपती बाप्पांची मूर्ती आणत गणेशोत्सवाला प्रारंभ केला आहे. ढोल ताशांसह कोकणच्या पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर ताल धरत कोकणवासियांनी बाप्पाचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी गणेश मूर्तींच्या आगमनाच्या मिरवणुका काढण्यात आल्या.