जयेश जगड, झी मीडिया, अकोला : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यामुळं प्रदूषण होतं ही बाब आत्मसाध करून अकोल्याच्या एका गणेश भक्तने चॉकलेटचा गणपती तयार केला आहे. पर्यावरणाला पुरक आणि सर्वांचेच आवडते चॉकलेट असा सुंदर मेळ घालत 'चॉकलेटचा बाप्पा' बनवण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोल्यातील प्रसिद्ध ' वीरा दा ढाबा ' येथील चॉकलेटची श्रींची मूर्ती सध्या चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरला आहे. सुंदर आणि देखणी अशी ही श्रींची मूर्ती येथील संचालिका राधिका छतवाल यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली आहे. ही मूर्ती तयार करण्यासाठी येथील दोन्ही 'शेफ' यांनी महत्वाची भूमिका वाजवली आहे. चॉकलेटपासून तयार करण्यात आलेली गणेशमूर्ती सुंदर दिसत असून ती अतिशय आकर्षक पद्धतीने सजवण्यात आली आहे.


ही मूर्ती बेल्जियम चॉकलेट आणि पांढऱ्या चॉकलेटपासून तयार करण्यात आली आहे. ही मूर्ती सुमारे दोन फुटाची असून या मूर्तीचे वजन तब्बल १३ किलो इतके आहे. विशेष काळजी म्हणून गणपतीची ही मूर्ती विरघळू नये (मेल्ट होऊ नये ) म्हणून ही खोली वातानुकूल तयार करण्यात आली आहे.



तब्बल १५ दिवस खर्च करून ही गणेशमूर्ती तयार केली आहे. पाचव्या दिवशी गणेशाची ही मूर्ती दुधात विसर्जित केली जाणार असून हे दूध प्रसाद स्वरूपात भक्तांमध्ये वितरित करण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिकानं गणेशाची प्रतिष्ठापना आणि विसर्जन असं कल्पक पद्धतीनं केल्यास तो गणेशोत्सव आगळावेगळा ठरेल असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.