लाल मातीची जमीन कुणी गिळली? मूर्तीकाराचा सवाल
श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : मातीच्या मूर्तीची स्थापना करुन पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं असताना यवतमाळमध्ये मूर्तीकारांना मूर्ती घडवण्यासाठी लाल माती मिळणंच कठीण झालंय.
विघ्यहर्त्याच्या निर्मितीवरच यंदा विघ्न आलंय. राजेंद्र बेहरे या पिढीजात कुंभार व्यावसायिक प्रशासनाच्या तुघलकी वर्तणुकीनं मेटाकुटीस आलेत. गेली अनेक वर्षे त्यांना लोहारामधल्या शेत सर्व्हे नंबर ११७/३ मधून यवतमाळ तहसीलदारांनी माती उचलण्यास परवानगी दिली. त्यासाठी त्यांनी रीतसर परवानगी घेत शासनाची रॉयल्टी देखील भरली. मात्र असं असतानाही तहसीलदारांनी या जागेवर लाल माती नाही, असं कारण देत त्यांना परवानगी नाकारलीय.
बेहरेंनी एमआयडीसीलाही परवानगी मागितली पण त्यांनीही ती नाकारली. त्यामुळे महसलूची लाल माती असलेली जमीन अचानक गायब कशी झाली? असा प्रश्न निर्माण झालाय. कुणाकडून न्याय न मिळाल्यानं अखेरीस बेहरे यांनी न्यायालयाचं दार ठोठावलंय.
यासंदर्भात तहसीलदारांना विचारलं असता त्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायालय जो निर्णय देईल त्यानुसार पुढील कार्यवाही होईल, असं म्हटलंय.
यावर तोडगा न काढल्यास मोठा पेच निर्माण होणारेय. सोबतच मूर्तीकारांची उपासमार देखील होत आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी लक्ष घालून तोडगा काढण्याची गरज निर्माण झालीय.