दसरा मेळाव्यासाठी गेला आणि परतलाच नाही; रायगडमधील शिंदे समर्थक बेपत्ता?
आमदार भरत गोगावले यांनी या व्यक्तीचा शोध घेतला जात असल्याचे म्हटलं आहे
प्रफुल्ल पवार, झी मीडिया, अलिबाग : शिवसेनेतील (Shivsena) फूटीनंतर बुधवारी ठाकरे गट (Uddhav Thackeay) आणि शिंदे गट (CM Eknath Shinde) असे दोन दसरा मेळावे (Dussehra Melava) पार पडले आहेत. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं जोरदार शाब्दिक युध्द पाहायला मिळालं. शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeay) तर बीकेसी (BKC) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भाषणं झाली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले. बीकेसीतील मेळाव्यानंतर आता वेगळीच माहिती समोर आलीय.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी गेलेले रायगड येथील गणेश सुंदर सकपाळ हे मेळाव्यातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. गणेश सकपाळ हे पोलादपूर तालुक्यातील कापडे गावचे रहिवासी आहेत. दसऱ्याच्या दिवशी ते बीकेसी मैदानावरील एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी गेले होते. शिंदे गटाकडून आरक्षित करण्यात आलेल्या एसटी बसने त्यांनी मुंबई गाठली होती.
मेळावा संपल्यानंतर त्यांच्या साथीदारांनी गणेश यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता मात्र ते सापडले नाहीत. गेल्या दोन दिवसांपासून ते घरी परतले नाहीत. तसेच त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. या संदर्भात आमदार भरत गोगावले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिलाय. गणेश सकपाळ यांचा आपण त्याचा शोध घेत असल्याचे भरत गोगावले यांनी सांगितले.