Ganesh Visarjan: मुंबई, पुणे शहरामध्ये गणेश विसर्जनाची तयारी सुरु आहे. एका दिवसावर विसर्जन आले आहे. तुम्हीपण बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत असाल तर स्वत:चे खिसे संभाळून. कारण गणेशोत्सव काळात झारखंडची टोळी सक्रीय झाली आहे. ही टोळी भाविकांचे खिसे कापून मोबाईल लंपास करणाऱ्यांची टोळी सक्रीय झाली आहे. हडपसर पोलिसांनी या चोरांच्या टोळीला अटक केली असून त्यांच्याकडून 16 लाखांचे तब्बल 52 मोबाईल जप्त केले आहेत. या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील गणेशोत्सवात चोरीच्या अनेक घटना समोर आल्या. गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणे अशी चोरांची रणनीती होती. यासाठी आरोपी 12 सप्टेंबर रोजी तीनपहाड रेल्वे स्थानकात एकत्र भेटले. येथे त्यांनी मिळून प्लानिंग केले. यानंतर हाटिया एक्सप्रेसने 14 सप्टेंबर रोजी पुण्यात येऊन त्यांनी हडपसर, येरवडा, विश्रामबाग, फरासखाना, बंडगार्डन, स्वारगेट आणि इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरले. यासंदर्भात पोलिसांकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. 


त्याअनुषंगाने पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने तपास सुरु केला आणि चोरांना ताब्यात घेतले. शामकुमार संजय राम, विशालकुमार गंगा महातो, बालदलकुमार मोतीलाल माहतो  विकीकुमार गंगा माहतो उर्फ बादशाह नोनीया यांना अटक करण्यात आली. हे आरोपी झारखंडच्या सायबगंज जिल्ह्यातील असून 21 ते 25 वयोगटातील आहेत. यांचे साथीदार गोपी माहतो, राहुल महातो येरवडा भागातून फरार झाले आहेत.


हडपसर तपास पथकाने चोरीच्या घटनांवर कारवाई केली आहे. आरोपींकडून 4 चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस विभागाला यश आले आहे. आरोपींकडून भाविकांचे 16 लाखांचे 52 मोबाईल जप्त करण्यात आले आहे. मागील दोन दिवसात हडपसर पोलिसांनी 72 मोबाईल जप्त केल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच चोरी करणाऱ्या 9 परप्रांतीय चोरट्यांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक विश्वास डगले, संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


तर गुन्हे दाखल होणार


गणपती विसर्जन मिरवणूक सुरक्षित आणि वेळेत आटोपण्यासाठी पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे पोलिसांकडून गणेश मंडळांना ढोल-ताशा पथकांना बेलबाग, उंबऱ्या गणपती (शगुन) आणि टिळक चौक या केवळ तीन चौकात वादनासाठी परवानगी देण्यात आली आहे. मंडळांना या तीन चौकात अवघे दहा मिनिटे वादन करता येणार आहे. तसेच इतर कोणत्याही चौकात; तसेच विसर्जन मार्गावर पथकांना रेंगाळता येणार नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान स्पीकर आणि लेझर लाइट लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.