प्रणव पोळेकर, झी मीडिया, रायगड : कोकणात गणेशोत्सव (ganeshotsav 2023) साजरा करुन चाकरमानी मुंबईकडे परतत आहेत. मात्र जाताना त्रास सहन करत गेलेल्या चाकरमान्यांना पुन्हा एकदा त्रासाला तोंड देत मुंबई गाठावी लागत आहे. भरगच्च भरलेल्या ट्रेन, खड्डेमय रस्ते असा खडतर प्रवास करुन चाकरमानी कोकणात (Kokan) पोहोचला होता. पण आता घरी परतानाही व्यवस्थित प्रवासाची सोय नसल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या स्पेशल ट्रेन तब्बत चार तास लेट असल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. तर दुसरीकडे, चिपळूणमध्ये (Chiplun) प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच दिवसांच्या गणपतीला निरोप देऊन कोकणातील चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. मात्र रेल्वेगाड्या उशीरा धावत असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशन वरती मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली आहे. कोकण कन्या, गणपती स्पेशल, तुतारी एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांमधून चाकरमानी मुंबईकडे परतीचा प्रवास करणार आहेत.परतीच्या प्रवासावेळी रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, गणपती स्पेशल गाड्या 4 तास. तुतारी एक्स्प्रेस 1.30 तास उशिराने धावत आहेत.


कोकणात्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गाड्या उशिराने सुटत असल्याने स्थानकांवर गर्दी वाढतच चालली आहे. तळकोकणातूनच रेल्वेगाड्या भरुन येत असल्याने विविध सावर्डे, चिपळून, खेड यासारख्या छोट्या स्थानकांवर प्रवासी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आतमध्ये जागा नसल्याने त्यांना गाड्या सोडाव्या लागत आहेत. यातून काही ठिकाणी वाद देखील होत असल्याचे पाहायला मिळत आहेत.


चिपळूण इथल्या पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. या प्रवासासाठी गाडीमध्ये गॅस भरण्यासाठी वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. मुंबई गोवा महामार्गावर या वाहनांच्या दोन किमीपर्यंत रांगा लागल्या आहेत. गॅस भरण्यासाठी विलंब होत असल्याने चाकरमान्यांनाचा परतीचा प्रवास देखील लांबत आहे. यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होत आहे.