Ganpati Special ST Bus 2024: कोकणी माणसाला आता वेध लागले आहेत ते गणेशोत्सवाचे.  गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी  गणेशोत्सव काळात जादा बसेस सोडण्याच्या निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. गणेशोत्सवात एसटीच्या जादा 4300 बसेस धावणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

7 सप्टेंबर 2024 रोजी  गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा जादा बसेस सोडण्याच्या निर्णय घेतला आहे. 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान 4300 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 


व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. 2 सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी गणेशोत्सवार 3500 बसेस सोडण्यात आल्या होत्या.  यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये 800 बसेसची वाढ करण्यात आली आहे.


गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे 4300 जादा बसेस कोकणातील रस्त्यावर धावतील.


असा करा ST बसचे बुकिंग 


सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे,उपलब्ध होणार आहे.  गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.