पुण्याच्या एन्जॉय ग्रुपचा खेळ खल्लास! 7 पिस्तूल, 23 जिवंत काडतूस, मॅटर भाई आणि...
पुणे पोलिसांनी एका कुख्यात टोळीला जेरबंद केले आहे.
Pune Crime News : पुण्यातील लोणीकंद पोलिसांनी हडपसर परिसरातील कुख्यात टोळीच्या मुस्क्या आवळल्या आहेत. एन्जॉय ग्रुप नावाने सक्रिय असलेल्या 8 जणांना पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे. त्यांच्याकडून 7 पिस्तूल आणि 23 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत. या टोळीविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.
या गँगने विरोधी गँग मधील म्होरक्याच्या हत्येचा कट रचला होता. याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मुंढवा तसेच नऱ्हे परिसरात कारवाई करत पोलिसांनी ही टोळी जेरबंद केली आहे. शुभम ऊर्फ मॅटर अनिल जगताप (वय 27 वर्ष), सुमित उत्तरेश्वर जाधव (वय 26 वर्ष), अमीत म्हस्कु अवचरे (वय 27 वर्ष), ओंकार ऊर्फ मैय्या अशोक जाधव ( वय 24 वर्ष), अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे (वय 27 वर्ष), राज बसवराज स्वामी (वय 26 वर्ष), लतिकेश गौतम पौळ (वय 22 वर्ष), रौफ ऊर्फ लाला बागवान (वय 23 वर्ष) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व एन्जॉय ग्रुपचे सदस्य आहेत. लोणीकंद पोलिसांनी यांना अटक केली आहे.
पुण्यातील कोयता गँगची दहशत
पुण्यातील कोयता गँगमधील दोघांना अटक करण्यात आली आहे. पुण्यात शहरात हातात कोयते घेऊन नागरिकांना मारहाण केली जात होती. मात्र, पोलीस या गुंडांकडे दुर्लक्ष करत होते.. झी 24 तासनं बातमी लावताच याप्रकरणाची गंभीर देखल घेत तातडीनं कारावईला सुरुवात झाली.. आणि या कोयता गँगमधील दोघांना रात्रीतून अटक करण्यात आली.. सौरभ भगत ,संदीप शेंडकर अशी या आरोपींची नावं आहेत.. त्यांचे 6 साथीदार फरार झाले.