रत्नागिरी : कोकणातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे उन्हाळे तीर्थ येथे आज गुरुवारी सकाळी ८ वाजता आगमन झाले. गंगामाईचे आगमन झाल्याचे कळताच भक्तांनी धाव घेतली आणि पवित्र १४ कुंडातील पाण्याने स्नान करण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या गंगेचे दीड वर्षानंतर आज सकाळी आगमन झाले. राजापूरची गंगा ही तर ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका उंच टेकडीवरील जमिनिला लागून असलेल्या १४ कुंड अचानक पाण्याने भरून जातात. साधारण तीन वर्षांतून एकदा हा निसर्ग चमत्कार पहायला मिळतो. मात्र या वेळेस दीड वर्षाने गंगामाई प्रकट झाली. एकूण १४ कुंडांसह काशी कुंड आणि मूळ गंगा या ठिकाणाहून पाणी प्रवाहित झाले आहे. या वाहत्या पाण्याला राजापूरची गंगा म्हणतात.


ही गंगा उगम पावते आणि साधारणपणे तीन महिने राहते. राजापुरात गंगेचे आगमन झाल्याची बातमी सर्वदूर पोहचताच अनेक भाविकांना ओढ लागते ती गंगेचे दर्शन घेऊन गंगेत स्नान करण्याची. यावेळी उन्हाळी सुट्टीसाठी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होणारे मुंबईकर चाकरमानी आणि भाविक गंगास्नानासाठी गर्दी करतील, अशी शक्यता आहे.