Ganeshotsav 2022: गणपतीची आरती पाठ नाही? एका क्लिकवर संपूर्ण आरती संग्रह
गणपतीची आरती येत नसल्यास काळजी करु नका. एका क्लिकवर संपूर्ण आरती संग्रह (All Aarti for Ganpati) मिळवा.
Aarti Sangrah : गणरायाचं आगमन काही दिवसांवर आलं आहे. यंदा 2 वर्षानंतर गणेशोत्सवाचा मोठा उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे बाजारपेठ देखील फुलल्या आहेत. लोकांकडून गणपतीसाठी जोरदार खरेदी सुरु आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी यंदा कोणतेही कोरोनाचे नियम लागू नसतील. त्यामुळे आता गणरायाच्या आगमनासाठी सगळेच सज्ज झाले आहेत.
गणपती घरी विराजमान झाले की दररोज 2 वेळा नित्य नियमाने आपण गणरायाची आरती (Ganpati aarti) करत असतो. या वेळी अनेक जण आपल्या घरी आरतीसाठी आनंदाने सहभागी होण्यासाठी येत असतात. पण गणपतीसह इतर सर्व आरती (Ganpati all aarti) सगळ्यांनाच येते असे नाही. त्यामुळे तुमच्यासाठी आम्ही संपूर्ण आरती संग्रह घेऊन आलो आहोत.
गणपतीची आरती
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |
कंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ ||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुमकेशरा |
हिरे जडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 ||
लंबोदर पितांबर फनी वरवंदना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना |
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती || ३ ||
शंकराची आरती
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।
वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।।
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।1।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा।।
आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।।
कर्पुगौरा भोळा नयनीं विशाळा।
आर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा।
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय. ।।2।।
देवी दैत्यीं सागरमंथन पैं केलें।
त्यामाजी जें अवचित हळाहळ उठिलें।
तें त्वां असुरपषं प्राशन केलें।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें।। जय. ।।3।।
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी।
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी।
रघुकुलतिलक रामदासा अंतरी।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा।।4।।
दुर्गा आरती
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी।
वारी वारी जन्म मरणांते वारी।
हारी पडलो आता संकट निवारी॥१॥
जय देवी जय देवी महिषा सुरमथिनी।
सुरवर ईश्र्वर वरदे तारक संजीवनी॥धृ॥
तुजवीण भुवनी पाहता तुज ऐसे नाही।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही।
साही श्रमले परंतु न बोलवे काही।
साही विवाद करिता पडले प्रवाही।
ते तू भक्तालागी पावसी लवलाही॥२॥
प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा।
क्लेशांपासूनी सोडवी तोडी भवपाशा।
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा।
नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा॥३॥
ज्ञानराजा आरती
आरती ज्ञानराजा |
महाकैवल्यतेजा |
सेविती साधुसंत ||
मनु वेधला माझा || आरती || धृ ||
लोपलें ज्ञान जगी |
हित नेणती कोणी |
अवतार पांडुरंग |
नाम ठेविले ज्ञानी || १ || आरती || धृ ||
कनकाचे ताट करी |
उभ्या गोपिका नारी |
नारद तुंबर हो ||
साम गायन करी || २ || आरती || धृ ||
प्रकट गुह्य बोले |
विश्र्व ब्रम्हाची केलें |
रामजनार्दनी |
पायी मस्तक ठेविले |
आरती ज्ञानराजा |
महाकैवल्यतेजा || सेविती || ३ ||
तुकारामांची आरती
आरती तुकारामा
स्वामी सद्युरुधामा
सच्चिदानंद मूर्ती
पाय दाखवी आम्हा
दाखवी आम्हा
आरती तुकारामा
राघवे सागरात
पाषाण तारीले
तैसे हे तुकोबाचे
अभंग उदकी रक्षिले
उदकी रक्षिले
आरती तुकारामा
तुकिता तुलनेसी
ब्रह्म तुकासी आले
म्हणोनि रामेश्वरे
चरणी मस्तक ठेविले
मस्तक ठेविले
आरती तुकारामा
स्वामी सद्युरुधामा
सच्चिदानंद मूर्ती
पाय दाखवी आम्हा
दाखवी आम्हा
आरती तुकारामा
आरती विठ्ठलाची
येई हो विठ्ठले माझे माउली ये ||
निढळावरी कर ठेवूनि वाट मी पाहे ||
आलिया गोलिया हाती धाडी निरोप |
पंढरपुरी आहे माझा मायबाप || १ ||
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला |
गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला || २ ||
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी ||
विष्णुदास नामा जीवेभावे ओवाळी || ३ ||
असो नासो भाव आम्हा तुज्या थाया
कृपाद्रिष्टि पाहे माझा पंढरीराया
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥
विठोबा आरती
युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।
तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी ।
कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।।
जय देव ।। 2।।
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवळिती राजा विठोबा सावळा।।
जय देव ।।3।।
ओवाळू आरत्या विठोबा सावळा ।।
जय देव ।।3।।
ओवाळू आरत्या कुर्वड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।।
जय देव ।।4।।
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती।।
दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती।
केशवासी नामदेव भावे ओंवळिती।।
जय देव जय देव ।।5।।
श्री गुरुदत्त आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रेलोक्य राणा ।।
नेती नेती शब्द न ये अनुमाना । सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ।।१।।
जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता। आरती ओवाळिता हरली भवचिंता। जय देव जय देव।
सबाह्य अभ्यंतरीं तू एक दत्त। अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।।
परा ही परतली तेथे कैंचा हा हेत । जन्मरमरण्याचा पुरलासे अंत ।।२।। जय देव जय देव
दत्त येऊनिया उभा ठाकला । सद्भावे साष्टांग प्रणिपात केला ।।
प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिधला । जन्ममरण्याचा फेरा चुकविला ।।३।। जय देव जय देव
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान। हारपले मन झाले उन्मन ।।
मीतूंपणाची झाली बोळवण । एका जनार्दनीं श्री दत्त ध्यान ।।४।। जय देव जय देव
दशावतारांची आरती
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्त संकटिं नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥ ध्रु० ॥
अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी ।
वेद नेले चोरूनि ब्रह्मया आणुनियां देसी ॥
मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।
हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ आरती० ॥ १ ॥
रसातळासी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकरासाठीं देवा कांसव झालासी ॥
दाढें धरुनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी ।
प्रल्हादाकारणें स्तंभीं नरहरि गुरगुरसी ॥ आरती० ॥ २ ॥
पांचवे अवतारीं बळिच्या द्वाराला जासी ।
भिक्षे स्थळ मागुनीं बळीला पाताळा नेसी ॥
सर्व समर्पण केलं म्हणुनी प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरुनी बळिच्या द्वारीं तिष्ठसी ॥ आरती० ॥ ३ ॥
सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला ।
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला ॥
निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ आरती० ॥ ४ ॥
मातला रावण सर्वां उपद्रव केला ।
तेहतिस कोटी देव बंदी हरिलें सीतेला ॥
पितृवचनालागीं रामें वनवास केला ।
मिळोनि वानरसहित राजा राम प्रगटला ॥ आरती० ॥ ५ ॥
देवकीवसुदेवबंदीमोचन त्वां केलें ।
नंदाघरीं जाउनी निजसुख गोकुळा दिधलें ।
गोरसचोरी करितां नवलक्ष गोपाळ मिळविले ।
गोपिकांचें प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ आरती० ॥ ६ ॥
बौद्ध कलंकी कलियुगीं झाला अधर्म हा अवघा ।
सोडुनी दिधला धर्म म्हणुनी न दिससी देवा ॥
म्लेंच्छमर्दन करिसी ह्मणोनि कलंकी केशवा ।
बहिरवि जान्हवी द्यावी निजसुखानंदाची सेवा ॥ आरती० ॥ ७ ॥
साईबाबा आरती
आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा।
चरणरजातली । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।। आ०।।ध्रु ०।।
जाळुनियां अनंग। स्वस्वरूपी राहेदंग ।
मुमुक्षूजनां दावी । निज डोळा श्रीरंग ।। आ०।। १ ।।
जयामनी जैसा भाव । तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाघना । ऐसी तुझीही माव ।। आ०।। २ ।।
तुमचे नाम ध्याता । हरे संस्कृती व्यथा ।
अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ।। आ०।। ३ ।।
कलियुगी अवतार । सगुण परब्रह्मः साचार ।
अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ।। द०।। आ०।। ४ ।।आठा दिवसा गुरुवारी । भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया । भवभय निवारी ।। आ०।। ५ ।।
माझा निजद्रव्यठेवा । तव चरणरज सेवा ।
मागणे हेचि आता । तुम्हा देवाधिदेवा ।। आ०।। ६ ।।
इच्छित दिन चातक। निर्मल तोय निजसुख ।
पाजावे माधवा या । सांभाळ आपुली भाक ।। आ०।। ७ ।।
मंत्रपुष्पांजली आरती
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा : ।।
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने ।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मस कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय ।
महाराजाय नम: ।
ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्यायीस्यात् सार्वभैम: सार्वायुष आं
तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति
तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो
मरूतस्यावसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति ।।
एकदंतायविघ्महे वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नोदंती प्रचोदयात् ।
मंत्रपुष्पांजली समर्पयामि ।।
।। गणपतिबाप्पा मोरया ।।
घालिन लोटांगण
घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन ।
भावे ओवाळिन म्हणे नामा ।।
त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव ।।
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ।
बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करमि यद्यत् सकलं परस्मै ।
नारायणायेती समर्पयामि ।।
अच्युतं केशवं राम नारायणम्
कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम्
जानकीनायकं रामचंद्र भजे ।।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृ्ष्ण कृ्ष्ण हरे हरे ।।
।। मंगलमुर्ती मोरया ।।
।। गणपतिबाप्पा मोरया ।।