यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करत मंडळांची पूरग्रस्तांना मदत
कोल्हापूरकरांना मदतीचा हात...
कोल्हापूर : कोल्हापुरात आलेल्या भीषण महापुरानंतर जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांचं नुकसान झाल आहे. महापुराने हजारो घरे पडली आहेत. या परिस्थितीशी सामना करता कोल्हापूरकर पुन्हा उभा राहत असून त्यांना मदत करण्यासाठी शेकडो हात मदत करत आहेत. कोल्हापूरचा गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या झगमगाटात साजरा होतो. कोल्हापूरच्या मिरवणुका बघायला अखंड महाराष्ट्रातून आणि सीमा भागातून मोठ्या संख्येने येतात. पण महापुरामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय अनेक गणेश मंडळानी घेतला आहे.
धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने पूरग्रस्त सहाय्यता समिती स्थापन करण्यात आली असून कोल्हापूर विभागातून कोल्हापूर सह सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांनी जिल्ह्यातील सामाजिक संस्था, गणेश मंडळ, दानशूर व्यक्ती, उद्योजक यांनी पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन धर्मादाय कार्यालयाने केले आहे.
धर्मादाय आयुक्त कार्यालयाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मंडळ, अनेक उद्योजक आता मदतीसाठी पुढे आली आहेत. पूरग्रस्तांना मदत म्हणून निधी दिला जावा यासाठी रोख रक्कम आणि चेक स्वरूपात या समितीकडे मदत जमा करत आहे.
अशाच दानशूर व्यक्तींनी पूरग्रस्तांना मदत केल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो पूरग्रस्त लवकरच स्वतःच्या पायावर उभी राहतील यात शंका नाही.