दीड दिवसाच्या पाहुणचारानंतर घरगुती गणपतींच विसर्जन
पायी हळुहळू चाला...
मुंबई : पाहता पाहता गणेशोत्सवाचा दिवस उजाडला आणि दीड दिवसांच्या बाप्पांची निरोप घेण्याचीही वेळ जवळ आली. सोमवारी, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घरोघरी आणि सार्वजनिक उत्सव मंडळांमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर मंगळवारी, दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन करण्यात येणार आहे.
घरी आलेला, सर्वांचाच लाडका पाहुणा दीड दिवसाचा पाहुणचार घेऊन आता आपल्या गावी पुन्हा जाणार आहेत. 'गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या'च्या गजरात घरगुती गणपतीचं विसर्जन करण्यात येत आहे. या विसर्जन सोहळ्यासाठी मुंबईत सर्व चौपाट्यांवर कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चौपाट्यांसोबतच विसर्जनासाठी मुंबईत विविध ठिकाणी कृत्रिम तलावांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
दीड दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जनाला पावसाचीही दमदार हजेरी पाहायला मिलत आहे. शनिवारपासूनच संततधार सुरु असणाऱ्या पावसाने मुंबईसह राज्यातील बऱ्याच ठिकाणी बरसण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी जोर धरलेला हा पाऊन मंगळवारी सकाळीही चांगलाच बरसत आहे. त्यामुळे मुंबईकरांचा काही अंशी खोळंबाही होत आहे. मुख्य म्हणजे सार्वजनिक मंडळांमध्ये पावसामुळे काहीशी गर्दी कमी असल्यामुळे अनेकांनी आपला मोर्चा या मंडळांना भेट देण्याकडे वळवल्याचंही पाहायला मिळत आहे. एकंदरच गणेशोत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळत आहे.