विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील कच-यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. सध्या मिळेल तिथं कचऱ्याला आग लावली जातेय. मात्र, कचऱ्याला लावलेली ही आगच नागरिकांच्या जीवावर उठू शकते, याची कित्येकांना जाणीवही नाही. 


धूर नागरिकांच्या जिवाशी!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद शहराची कचराकोंडी संपता संपत नाही. पाठोपाठ आता कचऱ्यातील धुरामुळं नागरिकांच आरोग्य धोक्यात आलंय. शहरात पसरलेला कचरा संपवण्यासाठी आता त्याला जाळण्याचा उद्योग सुरु झालाय. काही अज्ञात लोक हा कचरा पेटवतायत... तर कचऱ्यामुळे हैराण झालेले लोकही हा कचरा पेटवतायत. विविध भागात कचऱ्याला लावण्यात येणाऱ्या आगीमुळे नागरिकांचं आरोग्य मात्र धोक्यात आलंय. 


आरोग्यावर गंभीर परिणाम


धूरात डायऑक्सिन, फ्युरान्स, अर्सेनिक, मर्क्युरी, लीड, कार्बन मोनोक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, हायड्रोक्लोरिक अॅसिड अशी घातक रसायनं आहेत. यातून निघणारी राखसुद्धा पाण्यात आणि जमिनीत मिसळल्याने घातक परिणाम होऊ शकतो.


- श्वसन संस्थेला धोका


- शरीरावर एलर्जी


- डोळ्यांचे विकार


- यकृताचे आजार


- रोगप्रतिकारक शक्ती कमी होते


- विविध प्रकारचे कॅन्सर


- मज्जासंस्थेवर परिणाम


- गर्भवती स्त्रियांना आणि त्यांच्या गर्भवाढीला धोका निर्माण होऊ शकतो


दुसरीकडं रस्त्यावर फिरणाऱ्या कचऱ्याच्या गाड्याही जणू रोग प्रचारच करतंय की काय असं वाटतं. विरोधाच्या भीतीनं शहरात कच-याच्या गाड्या फिरताय. तर अनेक ठिकाणी शहराच्या मध्यभागी या गाड्या थांबल्यानं नागरिकांना त्रास होतोय.  


गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावरील कचऱ्यामुळे नागरिक हैराण झालेत. प्रशासनाकडून बैठकांवर बैठका होत आहेत. कागदी तोडगा निघाला असला तरी ग्राऊंड रिअॅलिटी 'जैसे थे' आहे. त्यामुळे या सगळ्यात नागरिकांचा श्वास गुदमरला जातोय.